इशान किशन टीम इंडियात कमबॅक करणार की नाही? जय शाह यांनी दिली झोंबणारी प्रतिक्रिया

| Updated on: Aug 17, 2024 | 5:05 PM

इशान किशन सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून डावलल्यानंतर इशान किशन बीसीसीआयच्या सूचनांकडे कानाडोळा करत होता. मात्र उपरती झाल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. इतकंच काय तर पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली. त्यामुळे टीम इंडियात परतणार की नाही याबाबत चर्चा सुरु झाली आहे. यावर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आपलं परखड मत मांडलं आहे.

इशान किशन टीम इंडियात कमबॅक करणार की नाही? जय शाह यांनी दिली झोंबणारी प्रतिक्रिया
Follow us on

इशान किशन सध्या देशांतर्गत बुची बाबू स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात इशान किशनची बॅट चांगलीच तळपली. 86 चेंडूचा सामना करत शतक ठोकलं. इशान किशनने 5 चौकार आणि 10 षटकारांच्या जोरावर 114 धावा केल्या. तसेच विकेटकीपिंगमध्येही त्याने आपली छाप सोडली आहे. असं असताना टीम इंडियात परतणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. पण टीम इंडियात परतण्यासाठी काय करावं लागेल? यावर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जय शाह यांनी स्पष्ट केलं की, इशान किशनला जर टीम इंडियात परतायचं असेल, तर नियमांचं पालन करावं लागेल. नियम म्हणजे देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागेल असा अर्थ होतो. इशान किशनने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटला केराची टोपली दाखवली होती. त्यानंतर बीसीसीआयने दट्ट्या दाखवत सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं होतं.

दुसरीकडे, दुलीप ट्रॉफीबाबतही जय शाह यांनी आपलं मत मांडलं. ‘जर तुम्ही दुलीप ट्रॉफीतील संघ पाहाल  तर रोहित आणि विराट वगळता बाकी सर्व खेळाडू आहेत. मी उचलेल्या कठोर पावलांमुळे श्रेयस अय्यर आणि इशान किशन दुलीप ट्रॉफीत खेळत आहेत.’ रवींद्र जडेजाचं उदाहरण देताना जय शाह म्हणाले की, ‘आम्ही थोडं कठोर वागलो आहोत. जेव्हा रवींद्र जडेजा जखमी होता तेव्हा त्याला फोन केला होता आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितलं होतं. आता ही बाब स्पष्ट आहे की, जो कोणी खेळाडू जखमी होऊन बाहेर जाईल. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये फिटनेस दाखवून भारतीय संघात परत येता येईल.’

इशान किशन बुची बाबू स्पर्धेत झारखंडचा कर्णधार आहे. या स्पर्धेनंतर इशान किशन दुलीप ट्रॉफीत खेळणार आहे. ही स्पर्धा 5 सप्टेंबरपासून होणार आहे. त्यामुळे इशान किशनचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वकाही व्यवस्थित जुळून आलं तर टीम इंडियाचं दार उघडेल. पुढच्या पाच महिन्यात टीम इंडिया 10 कसोटी सामने खेळणार आहे. तसेच इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा होणार आहे.  पुढच्या महिन्यात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका होईल. पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून आहे.