मुंबई : आयसीसी स्पर्धेत भारतीय संघांनं महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे. टी 20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली आहे. महेंद्रसिंह धोनीची छबी कॅप्टन कूल म्हणून सर्वश्रूत आहे. संघ कठीण परिस्थितीत असताना शांतपणे स्थिती हाताळण्याची कसोटी धोनीकडे असल्याचं सांगितलं जातं. धोनीच्या चेहऱ्यावर कोणतीही रिअॅक्शन पाहायला मिळत नसल्याचं कॅमेऱ्यात टिपलं गेलं आहे. पण जेव्हा कॅमेऱ्याची नजर त्याच्यावरून हटते तेव्हा खेळाडूंना त्याचं रौद्ररूप पाहायला मिळतं असा खुलासा ईशांत शर्मा याने केला आहे. माही मैदानावर खेळाडूंना कशाचीही पर्वा न करता शिव्या देतो असं त्याने सांगितलं आहे.
एका यूट्यूब पॉडकॉस्टवर धोनीच्या सिक्स सेंसबाबत ईशांत शर्माला प्रश्न विचारला गेला. धोनी शांतपणे स्थिती हाताळतो? याबाबत काय सांगशील. तेव्हा ईशांत शर्मा याने दिलेलं उत्तर ऐकून भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. धोनीचा स्वभाव शांत नसल्याचं त्याने यावेळी सांगितलं. इतकंच काय धोनी कोणत्याच बाबतीत शांत नसून मैदानावर शिव्यांची लाखोली वाहतो.
“धोनीची स्ट्रेंथ खूप साऱ्या आहेत. तो शांत आणि कूल अजिबात नाही. मैदानात तो शिव्यांची लाखोली वाहतो. मला तर खूप साऱ्या शिव्या दिल्या आहेत. मी हे मस्करीत सांगत आहे. पण छोट्या भावाच्या नात्याने त्याने मला समजावलं आहे. मी त्याला एकदा विचारलं की, तू माझ्यावर इतका का चिडतो? तर त्याने सांगितलं की मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावरच राग व्यक्त करतो. मी प्रत्येकावर चिडत नाही. तेव्हा मी बोललो मला नव्हतं माहित. त्यानंतर मी एकदम चिल्ल झालो.”, असं ईशांत शर्मा याने सांगितलं.
“माहीसोबत मी आयपीएल खेळलो आहे. तो गोलंदाजांच्या मीटिंगमध्ये येत नाही. तो सांगतो की ते तुमचं काम आहे. जे मैदानात करायचं आहे ते मी करतो. परिस्थिती आणि विकेट काही वेगळंही सांगू शकते. यासाठी तुम्ही तयार असू शकत नाही. अशा परिस्थितीला खुलेपणाने सामोरं जावं लागतं. विकेट आणि परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात.”, असंही ईशांत शर्मा याने पुढे सांगितलं.
ईशांत शर्मा 105 कसोटी, 80 वनडे, 14 टी 20 आणि 101 आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत 311, वनडेत 115. टी 20 मध्ये 8 आणि आयपीएल 82 गडी बाद केले आहेत. कसोटी कारकिर्दीत त्याने एकमेव अर्धशतक ठोकलं आहे.