टीम इंडियाने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी सहज विजय मिळवला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडिया या सामन्यात काही ठिकाणी अडचणीत सापडली होती. मात्र निर्णायक क्षणी भारतीय खेळाडूंनी परिस्थितीत सांभाळली आणि बांगलादेशला बॅकफुटवर ढकललं. पहिल्या डावात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. त्यानंतर दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि ऋषभ पंत या दोघांनी शतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात आर अश्विन याने 6 विकेट्स घेत सहज विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताच्या या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात. सामना कुठेही असोत, एक भक्कम संघ बनवण्याचं लक्ष्य असल्याचं रोहितने म्हटलंय.
टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 3 वेगवान गोलंदाजांना संधी दिली. भारतातील खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असतात. मात्र बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात स्थिती अशी नव्हती पेसर्सना खेळपट्टीतून मदत मिळत होती. रोहितने याबाबतही आपलं मत मांडलं.
“परिस्थितीत काहीही असोत, आम्ही घरात (भारतात) खेळो अथवा परदेशात, आम्ही आमचा बॉलिंग अटॅक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही गेल्या काही वर्षात जिथेही खेळलोत, तेथील परिस्थितीनुसार आम्ही कामगिरी करण्यात यशस्वी ठरलोय. तुम्हाला खेळाडूंना श्रेय द्यावं लागेल. गोलंदाजांना जेव्हा जबाबदारी दिली, तेव्हा त्यांनी अंग काढलं नाही. गोलंदाज पुढे येऊन जबाबदारी घेऊ इच्छितात”, असं रोहितने म्हटलं.
भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळी फेरीत जानेवारीपर्यंत आणखी 9 सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने त्यापैकी 4 सामने जिंकल्यास रोहितसेना सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचेल. अशात भारतीय कर्णधाराने चेन्नईतील विजयानंतर आनंद व्यक्त केला.
“आगामी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर आमच्यासाठी हा निकाल हा शानदार आहे. आम्ही फार वेळानंतर कसोटी सामना खेळलोय. आम्ही इथे(चेन्नई) आठवड्याआधी आणि चांगली तयारी केली. आम्हाला तोच निकाल मिळाला, ज्याची आम्हाला प्रतिक्षा होती”, असंही रोहितने नमूद केलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.