“विराट कोहलीला आऊट करणं सोपं, पण…”, जेम्स अँडरसन निवृत्तीनंतर सांगून गेला बरंच काही

| Updated on: Jul 13, 2024 | 10:31 PM

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील पहिला सामना खेळून जेम्स अँडरसनने निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्तीनंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्याने विराट कोहलीसोबतच्या द्वंद्वाबाबतही सांगितलं. सुरुवातीच्या काळात आणि शेवटी काय बदल झाला ते अधोरेखित केलं.

विराट कोहलीला आऊट करणं सोपं, पण..., जेम्स अँडरसन निवृत्तीनंतर सांगून गेला बरंच काही
Follow us on

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने 21 वर्षे कसोटी क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं. कसोटीत 704 विकेट्स घेत एक मोठा विक्रम नावावर केला आहे. इतक्या साऱ्या विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. या 21 वर्षांच्या कालावधीत त्याने अनेक दिग्गज फलंदाजांना गोलंदाजी केली. यात सचिन तेंडुलकरसह दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळे अँडरसनच्या कारकि‍र्दीत अनेक गुपितं लपली आहेत. कोणत्या फलंदाजाबाबत काय वाटत होतं आणि कोण कसा खेळला, याचा उलगडा आता मागे वळून पाहताना करत आहे. दरम्यान, अँडरसनने काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरची स्तुती करताना सांगितलं होतं की तो एक महान फलंदाज होता. त्याच्यासमोर गोलंदाजी करणं खरंच कठीण होतं. आता स्विंगचा किंग असलेल्या अँडरसनने रनमशिन विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे. कसोटी सामन्यात विराट आणि अँडरसन बऱ्याचदा आमनेसामने आले आहेत. सुरुवातीच्या काळात विराट कोहली त्याचा गिऱ्हाईक होता. मात्र नंतर तसं काही झालं नाही. 2021 हेडिंगले कसोटीत अँडरसनने कोहलीला शेवटचं बाद केलं होतं. 2024 मध्ये अँडरसन भारताविरुद्ध शेवटचा खेळला पण तेव्हा वैयक्तिक कारणामुळे विराट या मालिकेत खेळला नव्हता.

जेम्स अँडरसनने विराट कोहलीबाबत सांगितलं की, “काही मालिकांमध्ये तुम्हाला छान वाटतं. पण अनेकदा तु्म्हाला निराश व्हावं लागतं. कारण फलंदाज तुमच्यावर हावी होतात. जेव्हा विराट कोहली त्याच्या सुरुवातीच्या काळात खेळत होता. तेव्हा असं वाटत होतं की, त्याला प्रत्येक चेंडूवर बाद करू शकतो. पण गेल्या काही वर्षात एक गोलंदाज म्हणून त्याच्यासमोर कमकुवत वाटू लागलं आहे.”, असं जेम्स अँडरसन म्हणाला. विराट कोहली आणि जेम्स अँडरसन 2014 साली पहिल्यांदा आमनेसामने आले होते. तेव्हा विराट कोहलीला बाद करत वरचढ असल्याचं दाखवून दिलं होतं.

अँडरसनने कसोटी सामन्यांच्या 10 डावात चारवेळा विराट कोहलीला बाद केलं होतं.मात्र 2016 मध्ये चित्र वेगळं दिसलं. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहली अँडरसनवर तुटून पडला. 2018 साली झालेल्या मालिकेतही विराट वरचढ ठरला. त्यात त्याने 10 डावांमध्ये 2 शतकं, 3 अर्धशतकांसह 593 धावा केल्या. या मालिकेत अँडरसन त्याला एकदाही बाद करू शकला नाही.