IVPL | आयपीएलनंतर आता आयव्हीपीएल स्पर्धेचा जलवा, हे दिग्गज खेळणार

| Updated on: Jun 29, 2023 | 10:22 PM

Indian Veteran Premier League 2023 | क्रिकेट चाहत्यांना आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान आणखी एका स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

IVPL | आयपीएलनंतर आता आयव्हीपीएल स्पर्धेचा जलवा, हे दिग्गज खेळणार
Follow us on

मुंबई | भारतात दरवर्षी आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचं आयोजन केलं जातं. यंदा नुकताच आयपीएल 16 व्या मोसम पार पडला. चेन्नई सुपर किंग्स 16 व्या हंगामाची चॅम्पियन ठरली. आता आयपीएलनंतर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे टीम इंडियाचा विंडिज दौरा, आयर्लंड दौरा, आशिया कप स्पर्धा आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेकडे लागलं आहे. त्यात आता क्रिकेट चाहत्यांना आणखी एका स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. आयपीएलनंतर आता आयवीपीएल स्पर्धेचं आयोजन करण्यात येणर आहे. इंडियन पॉवर क्रिकेट एकेडमीने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

आयव्हीपीएल म्हणजेच इंडियन वेटरन प्रीमियर लीग स्पर्धा. या आव्हीपीएल स्पर्धेला येत्या नोव्हेंबर 2023 पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं एक खास वैशिष्ट्य आहे. या स्पर्धेत फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले आणि वयाची 35 वर्ष पूर्ण केलेले खेळाडूच सहभागी होणार आहेत. त्यामुळे क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा आपल्या खेळाडूंना मैदानात खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धेबाबत थोडक्यात पण महत्वाचं

या इंडियन वेटरन प्रीमियर लीग स्पर्धत एकूण 6 संघ सगभागी होणार आहेत. मुंबई लॉयंस, दिल्ली वॉरियर्स, वीवीआयपी गाजियाबाद, राजस्थान लिजेंड्स, तेलंगाना टायगर्स आणि छत्तीसगढ सुल्तान अशा 6 टीमची नावं आहेत. या स्पर्धेत एकूण 18 साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. सामन्याचं आयोजन हे 17-28 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. सर्व सामने हे डेहरादूनमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहेत. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना हा 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांना वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान आयव्हीपीएल सामनेही पाहायला मिळणार आहेत.

युवा खेळाडूंसाठी गूड न्यूज

या आयव्हीपीएल स्पर्धेमुळे युवा खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे. कारण प्रत्येक टीममध्ये एकूण खेळाडूंपैकी 70 टक्के युवा खेळाडूंचा समावेश असणार आहे. तर उर्वरित 30 टक्क्यांमध्ये दिग्गज म्हणजे निवृत्त खेळाडू असणार आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंची सोबत लाभणार आहे. तसेच मार्गदर्शनही मिळणार आहे. या स्पर्धेसाठीही आयपीएलप्रमाणे ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूवर किती बोली लावली जाते, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

हे दिग्गज पुन्हा मैदानात

दरम्यान या आयव्हीपीएल स्पर्धेच्या निमित्ताने ख्रिस गेल, लांस क्लूजनर, सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग, सनथ जयसूर्या, रॉस टेलर आणि दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. तर युवा खेळाडू कशाप्रकारे कामगिरी करतात, याकडे क्रिकेट चाहत्यांची बारीक नजर असणार आहे.