मुंबई : वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाचे आतापर्यंत तीन ते चार सामने झाले आहेत. यामधील भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ सोडले तर सर्व संघांनी पराभवाचा सामना केला आहे. वर्ल्ड कपमध्ये दोन मोठे उलटफेर पाहायला मिळाले ते म्हणजे अफगाणिस्तान संघाने वर्ल्ड कपविजेत्या इंग्लंड संघाचा पराभव केला होता. तर दुसरा उलटफेर म्हणजे नेदरलँड संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सर्वांना धक्का दिला होता. यामधील इंग्लंड संघासाठी आनंदाची बातमी असून त्यांच्या संघाची ताकद दुपटीने वाढली आहे.
इंग्लंड संंघाने 2019 साली वर्ल्ड कपवर पहिल्यांदा नाव कोरलं होतं. इंग्लंड संघाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात एका खेळाडूने मोलाची भूमिका बजावली होती. मात्र वर्ल्ड कपला सुरूवात झाली तेव्हा तो दुखापती असल्याने खेळता आलं नाही. इंग्लडं संघाला याचं फार मोठं नुकसान झालं, कारण सुरूवातीच्या तीन सामन्यांमध्ये फक्त एक विजय मिळवला असून दोन सामन्यामध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जोफ्रा आर्चर आहे. आर्चर असा खेळाडू आहे जो एकट्याच्या दमावर सामना फिरवण्याची ताकद ठेवतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये दुखापतीमुळे त्याला संघात आपलं स्थान टिकवता आलं नाही. परत एकदा इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यासाठी तो परत आला असल्याने चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास घेतलाय. सोशल मीडियावर जोफ्रा आर्चरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो सराव सत्रादरम्यान मैदानात दिसत आहे. वर्ल्डकपमध्ये त्याचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता.
दरम्यान, वर्ल्ड कप 2019 मध्ये जोफ्रा आर्चरने 11 सामन्यांमध्ये 20 विकेट घेतल्या होत्या. त्याचा ईकॉनॉमी रेट 4.77 इतका आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आता इंग्लंड संघाचा पुढील सामना दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे. मात्र जोफ्रा कोणत्या सामन्यात मैदानात उतरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.