मुंबई | टीम इंडिया 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. या आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये हायब्रिड पद्धतीने करण्यात येणार आहे. आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची काही दिवसांनी घोषणा करण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.
टीम इंडियाला आशिया कपआधी मोठा झटका लागला आहे. आशिया कपसाठी केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघे मुकणार आहेत. आशिया कपआधी जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा हे दोघे फिट झालेत. या दोघांची आयर्लंड दौऱ्यासाठी निवडही करण्यात आली. त्यांनतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही लवकरच फिट होऊन आशिया कप निवडीसाठी उपलब्ध होतील, असं चित्र होतं. मात्र अजूनही केएल आणि श्रेयस हे दोघेही खेळणार नसल्याचं समजतंय. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना मजबूत झटका लागलाय.
सोशल मीडियावर केएल राहुल याचा विकेटकीपिंग आणि बॅटिंग करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यामुळे केएल आता फीट झाल्याचंही म्हटलं जात होतं. पण तसं दुर्देवाने होऊ शकलेलं नाही. केएलला आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून केएल क्रिकेटपासून दूर आहे.
तर श्रेयस अय्यर यालाही पाठीच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएल आणि अनेक मालिकांमध्ये खेळता आलं नाही. आता याच दुखापतीने श्रेयसला आशिया कपमध्ये खेळण्यापासून रोखलंय. एका बाजूला बुमराह-प्रसिद्ध दोघेही परतलेत. तर केएल आणि श्रेयस हे दोघेही अजूनही दुखापतीतून सावरलेले नाहीत. यामुळे टीम इंडियासाठी कही खूशी कही गम अशी परिस्थिती आहे.
दरम्यान आशिया कपमध्ये एकूण 6 संघांमध्ये ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. या सहा सघांमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ क्रिकेट टीमचा समावेश आहे. नेपाळची आशिया कप स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
2 सप्टेंबर, टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान.
5 सप्टेंबर, टीम इंडिया विरुद्ध नेपाळ.