माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविलेले अंशुमन गायकवाड यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांना कर्करोगाचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 71 वर्षीय अंशुमन गायकवाड यांना ब्लड कँसर असून त्यांच्या गेल्या एक वर्षापासून लंडनच्या किंग्स कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र उपचारादरम्यान त्यांची आर्थिक स्थिती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्या मदतीसाठी पुढे यावं अशी मागणी माजी क्रिकेटपटूंनी केली होती. मात्र बीसीसीआयकडून त्यांच्या आव्हानाला अजूनतरी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या कपिल देव यांनी अंशुमन गायकवाड यांना उपचारासाठी आपली पेन्शनची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.
कपिल देव यांनी क्रीडा वाहिनीशी बोलताना सांगितलं की, “मी खूप दु:खी आणि निराश आहे. मला दु:ख होतंय की मी आशूसोबत खेळलो आहे. त्याची अशी परिस्थिती मी पाहू शकत नाही. कोणालाही अशा वेदना होऊ नयेत. मला खात्री आहे की बोर्ड त्याची काळजी घेईल. आमही कोणावरही जबरदस्ती करत नाही. पण आशुसाठी मदत मनापासून झाली पाहीजे. काही घातक गोलंदाजांसमोर उभं असताना त्याच्या चेहरा आणि छातीवर दुखापत झाली आहे. आता त्याच्यासाठी उभं राहण्याची वेळ आली आहे. मला विश्वास आहे की क्रिकेट फॅन्स निराश करणार नाहीत. क्रीडारसिकांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी.”
माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी सांगितलं की, “दुर्दैवाने आमच्याकडे काही सिस्टम नाही. हे चांगलं आहे की, आजकाल क्रिकेटपटू चांगले पैसे कमवत आहेत. सपोर्ट स्टाफलाही चांगला पैसा मिळत आहे. आमच्या काळात बोर्डाकडे पैसे नव्हते. आज त्यांच्याकडे पैसा आहे तर त्याने जुन्या खेळाडूंची काळजी घ्यायला हवी. पण ते आपलं योगदान कुठे देतात? जर एक ट्रस्ट बनवली असती तर ते आपला पैसा त्यात ठेवला असता. पण आमच्याकडे सिस्टम नाही. एक ट्रस्ट असली पाहीजे. मला वाटतं की बीसीसीआय असं करू शकते. या माध्यमातून माजी खेळाडूंची देखभाल करू शकतात. जर त्यांचं कुटुंबियांची परवानगी असेल तर मी माझं पेन्शन दान करून मदतासाठी तयारा आहे.”
71 वर्षीय गायकवाड यांनी 80 च्या दशकात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले होते. भारतासाठी 40 कसोटी सामने खेळणाऱ्या अंशुमनने 1 द्विशतक, 2 शतके आणि 10 अर्धशतकांसह 1985 धावा केल्या आहेत. तसेच 15 वनडे सामन्यात 1 अर्धशतकासह 269 धावा केल्या आहेत. अंशुमन गायकवाड यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. 1997 ते 2000 या काळात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना एक मजबूत भारतीय संघ तयार केला. या काळात भारतीय संघाने शारजाहमधील प्रसिद्ध कोका-कोला कप आणि पाकिस्तानविरुद्ध दिल्ली कसोटी जिंकली होती.