IPL Playoff Scenarios : कोलकाता-राजस्थान फिक्स! 2 जागांसाठी 7 जणांमध्ये चुरस, असंय समीकरण

| Updated on: May 06, 2024 | 5:53 PM

IPL 2024 Playoffs Scenarios : आयपीएलच्या 17 व्या मोसमात 54 सामन्यानंतरही एकही टीम अजून प्लेऑफसाठी पात्र ठरलेली नाही. 4 जागांसाठी जोरदार चुरस रंगली आहे.

IPL Playoff Scenarios : कोलकाता-राजस्थान फिक्स! 2 जागांसाठी 7 जणांमध्ये चुरस, असंय समीकरण
ipl 2024 captains in one frame
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमात आता प्लेऑफसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. रविवारी कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 98 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. केकेआर यासह 16 पॉइंट्ससह पहिल्या स्थानी पोहचली. केकेआरने राजस्थानला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं. कोलकाताचा नेट रनरेट सरस असल्याने सारखे गुण असूनही राजस्थानची दुसऱ्या स्थानी घसरण झालीय. प्लेऑफसाठी केकेआर आणि राजस्थान 2 संघ प्रबळ दावेदार आहेत. या दोघांचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित आहे.

प्लेऑफमधील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी जोरदार चुरस आहे. या 2 जागांसाठी 7 संघ शर्यतीत आहेत. यामध्ये चेन्नई, हैदराबाद आणि लखनऊ आघाडीवर आहेत. या तिन्ही संघांच्या नावे प्रत्येकी 12 पॉइंट्स आहेत. हैदराबादने चेन्नई आणि लखनऊच्या तुलनेत 1 सामना कमी खेळला आहे. हैदराबाद आपला पुढील सामना सोमवारी 6 मे रोजी मुंबई विरुद्ध खेळणार आहे. एका विजयासह टीमचं प्लेऑफमधील दावा आणखी मजबूत होईल. सध्या चेन्नई तिसऱ्या, हैदराबाद आणि लखनऊ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहे.

मुंबईचं पॅकअप

मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या 17 व्या मोसमातून बाजार उठला आहे. तर उर्वरित 9 संघ स्पर्धेत कायम आहे. मुंबईला 11 पैकी फक्त 3 सामन्यात विजयी होता आलं आहे. मुंबई 6 पॉइंट्ससह दहाव्या स्थानी आहे. दिल्लीचे 11 सामन्यानंतर 10 पॉइंट्स आहेत. दिल्लीने उर्वरित 3 सामने जिंकले, तर त्यांचे 16 पॉइंट्स होतील. त्यानंतर नेट रनरेटच्या आधारावर सर्वकाही ठरेल.

3 संघांना अजूनही संधी

आरसीबी पंजाब आणि गुजरात या 3 संघांसाठी प्लेऑफचा मार्ग खडतर आहे. तिन्ही संघांचे 11 सामन्यानंतर प्रत्येकी 8-8 पॉइंट्स आहेत. तिन्ही संघांनी उर्वरित 3 सामने जिंकले तरीही 14 पॉइंट्स होतील. त्यामुळे या तिन्ही संघांचं आव्हान हे जर-तरवर आहे. चेन्नई, लखनऊ, दिल्ली आणि हैदराबाद या संघांनी किमान 2-2 सामने गमावले, तर पंजाब, आरसीबी आणि गुजरातला थोडीफार संधी आहे. मात्र तसं होणं अवघड आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसात प्लेऑफचं तिकीट कुणालं मिळतं आणि कुणाला डच्चू? हे लवकरच स्पष्ट होईल.