गौतम गंभीरची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर केकेआर फ्रेंचायसीने दिली अशी प्रतिक्रिया

| Updated on: Jul 09, 2024 | 9:23 PM

गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षपदी निवड झाली आहे. या पदावर त्याची नियुक्ती होणार हे फ्रेंचायसीला आधीच माहिती होतं. त्यामुळे त्यांनी गौतम गंभीरचा निरोप सोहळ्याचं आयोजन केलं होतं. अखेर त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर केकेआर फ्रेंचायसीने खास ट्वीट केलं आहे.

गौतम गंभीरची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर केकेआर फ्रेंचायसीने दिली अशी प्रतिक्रिया
Follow us on

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीर याची नियुक्ती झाली आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती ट्वीट करून दिली आहे. गौतम गंभीर या पदावर साडेतीन वर्षे राहणार आहे. या कार्यकाळात त्याला टीम इंडियाला एका उंचीवर नेण्याचं कठीण आव्हान आहे. द्रविडच्या कार्यकाळात आयसीसी चषकाचा दुष्काळ दूर झाला. मात्र हा आयसीसी चषक विजयाचा रथ पुढे नेण्याचं आव्हान गौतम गंभीरच्या खांद्यावर आहे. साडे तीन वर्षात चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे. गौतम गंभीरचा हा कार्यकाळ व्यवस्थितरित्या पार पडला. तर ऑलिम्पिक 2028 स्पर्धेची धुरा देखील त्याच्या खांद्यावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गौतम गंभीरला या कार्यकाळात विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. दुसरं, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज खेळाडू क्रिकेटच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे त्यांची साथ पुढे मिळणं कठीण आहे. अशात गौतम गंभीरला नव्या संघाची बांधणी करण्याचं आव्हान आहे. खासकरून टी20 संघासाठी विशेष लक्ष घालावं लागेल. दरम्यान, गौतम गंभीरची प्रशिक्षपदी निवड झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने ट्वीट केलं आहे.

गौतम गंभीर हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार राहिला आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं. मागच्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सने त्याची नियुक्ती मार्गदर्शक म्हणून केली होती. त्याच्या मार्गदर्शनात कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरलं. या विजयानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षपदासाठी त्याच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत राहुल द्रविडचा कार्यकाळ होता. त्यामुळे त्याच्या नावाची घोषणा केली नव्हती. अखेर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपताच त्याच्या नावाची घोषणा केली आहे. यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने ट्वीट करून लिहिलं आहे की, “राष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देण्यापेक्षा मोठा सन्मान नाही”

कोलकाता नाईट रायडर्सच्या मार्गदर्शकपदी राहुल द्रविडच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. गौतम गंभीरची प्रशिक्षपदी निवड झाल्याने हे पद रिक्त झालं आहे. त्यामुळे केकेआर फ्रेंचायसीने राहुल द्रविडशी संपर्क साधल्याचं बोललं जात आहे. राहुल द्रविडने यापूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी भूमिका नवी नाही. 2014 ते 2015 या कालावधीत राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा मार्गदर्शक होता.