आयपीएल 2024 स्पर्धेतील जेतेपदाचा मानकरी कोण याची उत्सुकता आता आणखी ताणली गेली आहे. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यापैकी एक संघ जेतेपद मिळवणार हे आता निश्चित झालं आहे. या चार संघांमध्ये आता जेतेपदाची चुरस असणार आहे. दरम्यान पहिला क्वॉलिफायर सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 21 मे रोजी होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरी गाठणार आहे. तसेच पराभूत झालेला संघ एलिमिनेटर विजेत्या संघांशी दुसऱ्या क्वॉलिफायर फेरीत दोन हात करणार आहे. कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक जमेची बाजू आहे. आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफचा एक नियम कोलकाता नाईट रायडर्सच्या पथ्यावर पडणार आहे. काय आहे हा नियम आणि कोलकाता नाईट रायडर्सला कसा होईल फायदा ते जाणून घेऊयात
आयपीएल स्पर्धेच्या नियमानुसार कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना टाय झाला तर सुपर ओव्हरमध्ये निकाल जाईल. पण सुपर ओव्हरमध्येही हा सामना टाय झाला तर मात्र हा कोलकाता नाईट रायडर्सला फायदा होईल. कारण गुणतालिकेत टॉपला असलेल्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. जर या सामन्यात असं काही झालं तर शाहरुख खानच्या मालकीचा संघ अंतिम फेरी गाठेल.
दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तीन सामने रद्द करण्याची वेळ आली आहे. गुजरातचे दोन आणि राजस्थानच्या एका सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामने रद्द करण्याची वेळ आली. पण प्लेऑफमध्ये असं काही झालं तर निराश होण्याची गरज नाही. आयपीएल प्लेऑफसाठी राखीव दिवस ठेवले गेले आहेत. तसेच सामन्यावेळी 2 तासांचा अतिरिक्त वेळही असणार आहे. त्यामुळे पाऊस पडला तरी षटकं कमी करून त्याच दिवशी सामना संपण्यासाठी प्रयत्न असेल. तसं झालं नाही तर दुसऱ्या दिवशी सामना होईल.
राखीव दिवशीही सामना पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकला नाही. तर मात्र कोलकाता नाईट रायडर्सला याचा थेट फायदा होईल. कारण गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याने थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यात हैदराबाद आणि आरसीबी समोरासमोर आली आणि असंच काहीसं झालं तर मग हैदराबाद अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानवावर आहे.