कोलकाता नाईट रायडर्सचे क्वॉलिफायर फेरीत 24.75 कोटी वसूल, 18 चेंडूमध्ये हैदराबादचा ‘खेळ खल्लास’

| Updated on: May 21, 2024 | 10:47 PM

आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव पार पडला होता. या लिलावात कोट्यवधी रुपयांची उधळण झाली होती. यावेळी खेळाडूंवर मोजलेल्या रकमेचा आणि कामगिरीचा कुठेच तालमेल बसत नव्हता. गौतम गंभीरचा निर्णय चुकीचा ठरल्याचं अनेकांना वाटत होतं. पण क्वॉलिफायर फेरीत हा निर्णय योग्य ठरला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचे क्वॉलिफायर फेरीत 24.75 कोटी वसूल, 18 चेंडूमध्ये हैदराबादचा खेळ खल्लास
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सने धडक मारली आहे. क्वॉलिफायर 1 फेरीत कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादने जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसल्याचं दिसून आलं. सनरायझर्स हैदराबादचा संघ 19.3 षटकं खेळत 159 धावांवर सर्वबाद झाला. तसेच कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान कोलकाता नाईट रायडर्सने 8 गडी राखून पूर्ण केलं. या सामन्यात कोलकात्याकडून खेळणाऱ्या मिचेल स्टार्कने चमकदार कामगिरी केली. मिचेल स्टार्कने 4 षटकं टाकत 34 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. त्याच्या भेदक गोलंदाजीने पहिल्या षटकापासून हैदराबादचा संघ बॅकफूटवर गेला. हैदराबादला त्यानंतर लय मिळवणंही कठीण झालं आणि कोलकात्याचा विजय पहिल्याच डावात ठरला. या सामन्यापूर्वी मिचेल स्टार्कसाठी मोजलेल्या 24.75 कोटी रुपयांचा खूपच गवगवा केला गेला. कारण इतके पैसे मोजूनही स्टार्कला हवी तशी कामगिरी करता आली नाही. मात्र क्वॉलिफायर फेरीत त्याने आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध करून दाखवलं.

संपूर्ण स्पर्धेत घातक ठरलेल्या ट्रेव्हिस हेडला पहिल्याच षटकात स्टार्कने तंबूत पाठवलं. दुसऱ्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतरच्या स्पेलमध्ये अष्टपैलू नितीश रेड्डी याला झेलबाद केलं आणि शहबाज अहमदला त्रिफळाचीत केलं. राहुल त्रिपाठीची विकेटही त्याचा नावावर असती, पण श्रेयस अय्यरने रिव्ह्यू घेतला नाही. पण महत्वाचे विकेट घेत स्टार्कने हैदराबादचं कंबरडं मोडलं. त्यामुळे स्टार्कने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे.

आयपीएलच्या साखळी फेरीत स्टार्कची हवी तशी कामगिरी झाली नाही. त्याने 12 सामन्यात फक्त 12 गडी बाद केले. तरीही गौतम गंभीरने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला संधी दिली. अखेर स्टार्कने त्या संधीचं सोनं करून दाखवलं. तसेच कोलकात्याचे 24.75 कोटी रुपये वसूल करून दाखवले आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन.