मुंबई : टीम इंडियाचे शिलेदार हार्दिक आणि कृणाल पांड्यासाठी आजची सकाळ वाईट बातमी घेऊन आली. हृदयविकाराच्या झटक्याने हार्दिक आणि कृणाल पांड्याच्या वडिलांचं निधन झालं आहे. याबाबत दोन्ही खेळाडूंना माहिती देण्यात आली आहे. कृणाल पांड्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत खेळत असून तो वडोदरा या संघाचा कर्णधार आहे. परंतु वडिलांच्या निधनाची बातमी कळताच मॅनेजमेंटने कृणाल पांड्याला बायो सिक्योर बबलमधून बाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. कृणाल लवकरच घरी परतणार असून हार्दिक पांड्यादेखील 12.30 वाजेपर्यंत बडोद्यात दाखल होणार आहे. (Krunal, Hardik Pandya’s father passes away)
कृणाल पांड्या माघारी परतल्यानंतर केदार जाधव उर्वरित दोन सामन्यांमध्ये वडोदरा संघाचं नेतृत्व करणार आहे. हार्दिक आणि कृणालच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे बडोदा क्रिकेटने याबाबत दुःख व्यक्त केलं आहे. हार्दिक आणि कृणालला क्रिकेटपटू बनवण्यात त्यांचे वडिल हिमांशू पांड्या यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती फार बरी नव्हती तरीदेखील एक-एक पैसा जोडून त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना किरण मोरे क्रिकेट अकादमीमध्ये धाडलं, आणि आता दोन्ही मुलं देशासाठी क्रिकेट खेळत आहेत.
बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सीईओ शीशिर हट्टंगडी याबाबत म्हणाले की, ”पांड्या कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे आणि त्यामुळे कृणाल पांड्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा सोडून घरी परतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशन पांड्या कुटुंबाच्या दुखःत सहभागी आहे,”
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत कृणाल पांड्याने 3 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत. तर पहिल्या मॅचमध्ये 76 धावांची शानदार खेळी केली होती. कृणालच्या नेतृत्वात बडोद्याचा तिन्ही सामन्यात विजय झालेला आहे. बडोदा सी गटात आहे. या सी गटात बडोदा अव्वल क्रमांकावर आहे. दरम्यान हार्दिक पांड्या या स्पर्धेत सहभागी झालेला नाही. हार्दिक इंग्लंडविरोधातील मालिकेसाठी जोरदार सराव करतोय.
इतर बातम्या
बॅगेत सोन्याचं घबाड सापडलं; क्रिकेटपटू कृणाल पांड्या DRI अधिकाऱ्यांच्या ताब्यात
हार्दिक पांड्याची कसून मेहनत, जबरदस्त व्हिडीओ शेअर
(Krunal, Hardik Pandya’s father passes away)