मुंबई : लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत 6 नोव्हेंबरला गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात गुजरात जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंडिया कॅपिटल्सकडून फलंदाजीसाठी किर्क एडवर्ड्स आणि गौतम गंभीर ही जोडी मैदानात उतरली. संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी एस श्रीसंत मैदानात उतरला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गौतम गंभीरने उत्तुंग षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकर मारला. तिसरा चेंडू निर्धाव गेल्यानंतर एस श्रीसंत आणि गौतम गंभीर यांच्यात तू तू मै मै झाली. मात्र पंचांनी वेळीच हस्तक्षेप करत या दोघांमधील वाद शमवला. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर एस श्रीसंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यात त्याने गौतम गंभीरवर आरोपांच्या फैरी झाडल्या.
“गौतम गंभीरने मला वारंवार फिक्सर फिक्सर असं संबोधलं. पंचांसमोरही मला फिक्सर असं बोलून हिणवत होता. मी तेथून गेल्यानंतरही गंभीर या शब्दाचा वारंवार वापर करत होता. पण त्याच्याविरोधात एकही अपशब्द काढला नाही. तो कायमच लोकांसोबत असंच काहीसं वागतो.” असं एस श्रीसंत याने सांगितलं. त्याचबरोबर गंभीरकडे खूप पैसा असून त्याचा पीआर स्ट्राँग आहे. त्यामुळे गंभीर पीआरचा चुकीचा वापर करू शकतो.
एस श्रीसंतच्या आरोपानंतर गौतम गंभीर गप्प बसेल तर ना..गंभीरही सोशल मीडियावर उतरला आहे. पण मोजक्या शब्दातच त्याने एस श्रीसंतची बोलती बंद केली आहे. गंभीरने ऑफिशियल एक्स अकाउंटवर हसणारा एक फोटो पोस्ट केला असून त्याखाली कॅप्शन लिहिली आहे. “जेव्हा संपूर्ण जग लक्ष वेधण्यासाठी धावत आहे, तेव्हा आपण फक्त हसायचं असतं.”, अशी पोस्ट गौतम गंभीरने केली आहे.
Smile when the world is all about attention! pic.twitter.com/GCvbl7dpnX
— Gautam Gambhir (@GautamGambhir) December 7, 2023
गौतम गंभीरला माजी क्रिकेटपटू इरफान पठाणची साथ मिळाली आहे. इरफानने गौतम गंभीरच्या पोस्टखाली “हसणं हेच सर्वात मोठं उत्तर आहे भावा”, असं लिहिलं आहे.
Smile is the best Answer brother.
— Irfan Pathan (@IrfanPathan) December 7, 2023
दुसरीकडे, इंडिया कॅपिटल्सने गुजरात जायंट्ससमोर विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं होतं. पण गुजरात जायंट्सचा संघ फक्त 211 धावा करू शकला. गुजरातचा 12 धावांनी पराभव झाला. या सामन्यात इंडिया कॅपिटल्सकडून खेळताना गंभीरने 30 चेंडूत 51 धावा केल्या. तर एस श्रीसंतने 3 षटकात 35 धावा देत एक गडी बाद केला.