दोहा | लेजेंड्स लीग क्रिकेट 2023 स्पर्धेतील पहिला सामना 10 मार्च रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात इंडिया महाराजास विरुद्ध एशिया लायन्स आमनेसामने होते. या सलामीच्या सामन्यात एशिया लायन्सने इंडिया महाराजावर 9 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. सोहेल तनवीर आशिया लायन्सच्या विजयाचा हिरो ठरला. सोहेलने निर्णायक क्षणी इरफान पठाण याला बोल्ड करत सामना आशियाच्या बाजूने फिरवला. तसेच इंडिया महाराजासला असलेली विजयाची संधी हुस्कावून घेतली.
एशिया लायन्सने इंडिया महाराजाला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 166 धावांचे आव्हान दिले होते. मात्र आशियाच्या गोलंदाजांनी इंडियाला 156 धावांवरच रोखलं. इंडियाला 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 156 रन्सच करता आल्या. विजयी आव्हानासाठी मैदानात आलेल्या इंडियाची निराशाजनक सुरुवात राहिली. रॉबिन उथप्पा भोपळा न फोडता आऊट झाला. त्यानंतर इंडियाकडून कॅप्टन गौतम गंभीर आणि मुरली विजय या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. मात्र मुरली विजय 25 धावा करुन आऊट झाला.
त्यानंतर सुरेश रैना आणि गंभीर या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 15 धावा जोडल्या. सुरेश रैनाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रैना 3 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर गंभीरने मोहम्मद कैफ याच्यासह चौथ्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली. या दरम्यान गंभीरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अर्धशतकानंतर 4 धावानंतर गौतम गंभीर 54 धावांवर आऊट झाला.
त्यानंतर युसूफ पठाण आणि मोहम्मद कैफ झटपट आऊट झाले. यूसुफने 14 तर कैफने 22 धावा केल्या. मात्र दोघेही निर्णायक क्षणी आऊट झाले. स्टुअर्ट बिन्नी चोरटी धावा घेण्याच्या प्रयत्नात 8 धावांवर रनआऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 7 बाद 142 अशी झाली.
आता टीम इंडियाला 11 बॉलमध्ये गरज होती 24 धावांची आणि विकेट्स होत्या 3. सामना ऐन रंगात आला होता. मैदानात इरफान पठाण आणि हरभजन सिंह दोघेही मैदानात होते. इरफान पठाण याने 2 मोठे फटके मारल्याने विजयाची आशा होती. मात्र निर्णायक क्षणी सोहेल तनवीरने इरफानला बोल्ड करत सामना एशियाच्या बाजूने फिरवला. सामन्याचा हा टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर हरभजन आणि परविंदर अवाना मैदानात होते. मात्र या जोडीला इंडिया महाराजाला विजयी करण्यात अपयश आले.
एशियाकडून सोहेल तनवीर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर इसरु उडाणा, तिलकरत्ने दिलशान, थिसारा परेरा आणि अब्दुल रझाक या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी एशियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. एशियाने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 165 धावा केल्या. एशियाकडून मिस्बाह उल हक याने सर्वाधिक 73 रन्स केल्या. ओपनर उपूल थरंगाने 40 धावा केल्या. तर कॅप्टन शाहिद आफ्रिदी याने 12 रन्सचं योगदान दिलं. त्या व्यतिरिक्त इंडिया महाराजाच्या गोलंजदाजांनी एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठू दिला नाही.
इंडिया महाराजाकडून स्टुअर्ट बिन्नी आणि परविंदर अवाना या दोघांनी 2 विकेट्स घेतल्या.तर इरफान पठाण आणि अशोक दिंडा या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
इंडिया महाराजा प्लेइंग इलेव्हन | गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), मुरली विजय, सुरेश रैना, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, इरफान पठाण, हरभजन सिंग, अशोक दिंडा, प्रवीण तांबे आणि परविंदर अवाना.
एशियन लायन्स प्लेइंग इलेव्हन | शाहिद आफ्रिदी (कॅप्टन), तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा (विकेटकीपर), असगर अफगाण, मिसबाह-उल-हक, पारस खडका, थिसारा परेरा, अब्दुल रज्जाक, इसुरु उडाना, अब्दुर रज्जाक आणि सोहेल तनवीर.