लीजेंड्स लीग स्पर्धेत शिखर धवन खेळणार गुजरात संघाकडून, सलामीला असणार आक्रमक फलंदाज

| Updated on: Aug 29, 2024 | 8:04 PM

शिखर धवनने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण क्रीडारसिकांना त्याची फटकेबाजी लीजेंड्स लीग स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. गुजरात संघाकडून शिखर धवन मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 20 सप्टेंबरपासून होणार आहे.

लीजेंड्स लीग स्पर्धेत शिखर धवन खेळणार गुजरात संघाकडून, सलामीला असणार आक्रमक फलंदाज
Shikhar Dhawan
Follow us on

लीजेंड्स लीग 2024 स्पर्धेचं तिसरं पर्व सुरु होण्याआधी चर्चेत आलं आहे. कारण दिग्गज खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेपूर्वी दिल्लीत लिलाव प्रक्रिया पार पडली. या स्पर्धेत नुकतीच आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला शिखर धवन खेळणार आहे. दिल्लीत पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत जगभरातील निवृत्ती खेळाडूंनी भाग घेतला होता. पण या लिलावात शिखर धवनसाठी बोली लागली नाही. कारण त्याला गुजरात जायंट्स संघाने थेट साइन करून संघात घेतलं आहे. शिखर धवन या लीगमध्ये पहिल्यांदा खेळताना दिसणार आहे. धवन आपल्या क्रिकेट कारकिर्दित ओपनिंगला उतरला आहे. त्यामुळे या संघात त्याच्यासोबत सलामीला दिग्गज खेळाडू ख्रिस गेल उतरणार आहे. या संघात मोहम्मद कैफ, एस श्रीशांत आहेत.

या लिलावात गुजरातने एकूण 9 खेळाडू विकत घेतलं. या संघाचा कर्णधार ख्रिस गेल आहे. लियाम प्लंकेट सर्वात महागडा खेळाडू ठरला. लियाम प्लंकेटसाठी 41.56 लाख रुपये, मॉर्न वान विकेने 29.29 लाख, लेंडल सिमन्सने 37.5 लाख, असगर अफगान 33.17 लाख, जेरोम टेलरने 36.17 लाख, पारस खडका 12.58 लाख, सीकुगे प्रसन्ना 22.78 लाख, कामाऊ लेव्हरॉक 11 लाख, सायब्रँड एंजेलब्रेक्ट 15 लाख रुपये मोजले आहेत. खेळाडूंवर लागलेली बोली आणि दिग्गज खेळाडूंचा भरणा पाहता यंदाची स्पर्धा रोमांचक ठरणार आहे.

शिखर धवनने 24 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन फॉर्मेटमधून आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. शिखर धवनने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शिखर धवन खेळला. शिखर धवनने 34 कसोटी सामन्यात 40.61 च्या सरासरीने 2315 धावा केल्या. 167 वनडे सामन्यात 44.11 च्या सरासरीने 7436 धावा केल्या. 68 टी20 सामन्यात शिखर धवनने 27.92 च्या सरासरीने 1759 धावा केल्या. शिखर धवन आयपीएलमध्ये 222 सामन्यात खेळला आहे. यात त्याने 35.07 च्या सरासरीने 5324 धावा केल्या आहेत.

लिलावानंतर गुजरात जायंट्सचा संघ : शिखर धवन, ख्रिस गेल, लियाम प्लंकेट, मॉर्न व्हॅन विल, लेंडल सिमन्स, असगर अफगाण, जेरोम टेलर, पारस खडका, सीकुगे प्रसन्ना, कामाऊ लेव्हरॉक, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, मोहम्मद कैफ, एस श्रीशांत.