मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 17 व्या मोसमातील विजयाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सवर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 48 व्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 145 धावांचा पाठलाग करताना लखनऊला 20 व्या ओव्हरपर्यंत जोरदार कसर करावी लागली. मात्र लखनऊने विजय मिळवला. लखनऊने 19.2 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 145 धावा केल्या. लखनऊचा हा 6 वा विजय ठरला. तर मुंबईचा 10 सामन्यातील 7 पराभव ठरला. मुंबईच्या या पराभवानंतर प्लेऑफचं समीकरण आता फिस्कटलं आहे. मुंबईला आता दुसऱ्यांच्या भरोशावर रहावं लागणार आहे. मुंबईच्या या पराभवानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या काय म्हणाला हे जाणून घेऊयात.
मुंबईच्या फलंदाजानी घोर निराशा केली. मुंबईने पावर प्लेमध्ये 4 विकेट्स गमावल्या. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्यासारखे फलंदाज आऊट झाले. हार्दिकला तर भोपळाही फोडता आला नाही. मात्र त्यानंतर नेहल वढेरा 46, ईशान किशन 32 आणि टीम डेव्हिड याने केलेल्या 35 धावांच्या खेळीमुळे मुंबईला 144 धावांपर्यत मजल मारता आणि लखनऊसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं.
“मला वाटतं की लवकर विकेट्स गमावणं यातून सावरणं कठीण आहे. आम्ही आज ते करू शकलो नाही. अजून बॉल बघून फटके मारायचे होते. आम्ही त्या चेंडूवर हुकलो आणि आऊट झालो. आत्तापर्यंतचा हंगाम असाच होता. या खेळातून खूप काही शिकण्यासारखे आहे. ते विलक्षण झालंय”, असं हार्दिकने मुंबईच्या पराभवानंतर म्हटलं. तसेच हार्दिकने नेहल वढेराच्या खेळीचं कौतुक केलं.
“मला वाटते की नेहल वढेरा याने गेल्या वर्षीही असंच केलं होतं. नेहलला याआधी स्पर्धेत संधी मिळू शकली नाही. पण नेहल आयपीएलमध्ये खूप खेळेल आणि टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करेल”,असा विश्वास हार्दिकने व्यक्त केला. हार्दिक सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान बोलत होता.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान आणि मयंक यादव.