ऋषभ पंतने पराभवाच्या दिलेल्या कारणांशी प्रशिक्षक असहमत, दिल्लीविरुद्ध खेळताना कुठे चुकलं? ते सांगितलं

| Updated on: Mar 25, 2025 | 4:39 PM

लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेतील हातात असलेला पहिलाच सामना गमावला. या पराभवाची जो तो त्याच्या पद्धतीने मांडणी करत आहे. सामन्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने आपलं म्हणणं मांडलं. पण त्याचं विश्लेषण प्रशिक्षकांना काही रुचलं नाही. त्यांनी पराभवाची कारण अगदी त्याच्या उलट सांगितली.

ऋषभ पंतने पराभवाच्या दिलेल्या कारणांशी प्रशिक्षक असहमत, दिल्लीविरुद्ध खेळताना कुठे चुकलं? ते सांगितलं
ऋषभ पंत
Image Credit source: LSG Twitter
Follow us on

आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. खरं तर संपूर्ण सामन्यावर लखनौ सुपर जायंट्सची पकड होती. पण या सामन्यातील काही चुका भोवल्या आणि पराभव झाला. लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दिल्लीने 9 गडी गमवून 19.3 षटकात पूर्ण केलं. या पराभवानंतर ऋषभ पंतने काय चुकलं ते सांगितलं. पण अगदी याच्या उलट सहायक प्रशिक्षक लांस क्लूजनरने वक्तव्य केलं आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सच्या गोटात पहिल्या सामन्यापासूनच विचित्र वातावरण तयार झालं आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने सामन्यानंतर सांगितलं की, ‘आम्ही चांगली धावसंख्या केली होती. पण या पराभवातून बरंच काही शिकलो आहोत आणि चुकांची दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करू. या पराभवासाठी त्यांनी ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा यांना सामन्याचं चित्र बदललं. तर त्याने विप्रज निगमची साथ मिळाली आणि सामना त्याच्या पारड्यात झुकला.’

सामन्यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक लांस क्लूजनर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पराभवाची कारणमीमांसा केली. यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर हे ऋषभ पंतच्या अगदी उलट होतं. ‘टीम योग्य धावसंख्या उभारू शकली नाही. जर मला काही चूक दिसली तर मी सांगेन की आम्ही 20 ते 30 धावा कमी केल्या. त्यामुळे आम्ही गोलंदाजी करताना दबावात आलो. मला वाटतं की दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण आमच्यावर ही स्थिती ओढावण्याचं कारण म्हणजे आम्ही योग्य धावसंख्या उभारू शकलो नाहीत. खरं तर या धावा व्हायला हव्या होत्या. मला वाटतं की गोलंदाजांनी योग्य गोलंदाजी केली. थोडा स्पिन झाला. यासाठी मला वाटते की खूप चांगली विकेट होती. सर्वांसाठी काही ना काही होतं.’

‘मला वाटते की गोलंदाजी करणं कदाचित फलंदाजीच्या तुलनेत कठीण होतं. मी यासाठी हे सांगत आहे की आमच्याकडे अनुभव आणि फलंदाजीची क्षमता आहे. त्यामुळे आम्ही एवढ्या धावा करू शकलो. पुढचे दोन सामने आम्ही दुपारी खेळणार आहोत. त्यामुळे युवा खेळाडूंनी सकारात्मक राहावं. आम्हाला त्यांची क्षमता दाखवून द्यायची आहे.’, असं लांस क्लूजरने सांगितलं.