लखनऊ | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने लो स्कोअरिंग सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर 18 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. आरसीबीने लखनऊला विजयासाठी 127 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आरसीबीच्या भेदक माऱ्यासमोर लखनऊला ऑलआऊट 108 धावाच करता आल्या. आरसीबीने शानदार पद्धतीने निच्चांकी धावसंख्येचं हुशारीने बचाव केला. आरसीबीचे सर्वच गोलंदाज आणि टीम या विजयाचे हिरो ठरले.
लखनऊकडून कृष्णप्पा गौतम याने सर्वाधिक 23 धावांची खेळी केली. अमित मिश्रा याने 19 धावा केल्या. कृणाल पंड्या याने 14 धावा केल्या. नवीन उल हक आणि मार्क्स स्टोयनिस या दोघांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. आरसीबीकडून जोश हेझलवूड आणि कर्ण शर्मा या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, आणि हर्षल पटेल या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.आरसीबीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून अवघ्या 126 धावा केल्या. या 16 व्या हंगामातील आतापर्यंतची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. आरसीबीच्या ताफ्यात एकसेएक तोडीसतोड फलंदाज आहेत. मात्र आज एकाचीही बॅट अपेक्षेनुसार चालली नाही. आरसीबीकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर उर्वरित 8 जणांना दुहेरी आकडाही गाठण्यात अपयश आलं. तर एकमेव मोहम्मद सिराज भोपळा न फोडता माघारी परतला.
आरसीबीची केजीएफ त्रिमुत्री अर्थात कोहली, ग्लेन आणि फाफ हे तिकडी अपेक्षेनुसार मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. विराटने 31 धावा केल्या. मॅक्सेवल 4 धावा करुन तंबूत परतला. तर कॅप्टन फाफ याने 40 बॉलमध्ये सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. लखनऊच्या चिवट गोलंदाजीसमोर या तिघांना धावांसाठी संघर्ष करावा लागला. तर अखेरच्या काही षटकात दिनेश कार्तिक हा 16 धावांवर खेळत होता. मात्र तोही नॉन स्ट्राइक एंडवर रनआऊट झाला.
लखनऊकडून नवीन उल हक याने सर्वाधिक 3 फलंदजांना बाद केलं. रवि बिश्नोई आणि अमित मिश्रा या दोघांनी 2 विकेट्स घेतल्या. तर कृष्णप्पा गौतम याने1 विकेट घेतली.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.