MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीला मित्रानेच लावला 15 कोटींचा चुना! विश्वासात घेत अशी केली फसवणूक

| Updated on: Jan 05, 2024 | 3:35 PM

महेंद्रसिंह धोनीची जवळच्या मित्राने 15 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आता धोनीने रांची कोर्टात याचिका दाखल केली आहे. जवळच्या मित्रावर विश्वास ठेवणं धोनीला महागात पडलं. मित्राच्या नात्याने पैसा ओतला खरा पण अखेर पाठीत खंजीर खुपसल्याचं दिसून आलं. त्यामुळे कोर्टात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.

MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीला मित्रानेच लावला 15 कोटींचा चुना! विश्वासात घेत अशी केली फसवणूक
MS Dhoni : जवळच्या मित्रावर विश्वास ठेवणं धोनीला पडलं महागात! 15 कोटींसाठी कोर्टात घ्यावी लागली धाव
Follow us on

मुंबई : महेंद्रसिंह धोनी हे क्रिकेट विश्वातील मोठं नाव..धोनीचं नाव घेतलं की आयसीसी चषकांची कामगिरी सर्वप्रथम समोर येते. मैदानात एकदम शार्प असलेल्या धोनीने विरोधी संघाच्या खेळाडूंना सापळ्यात अडकवलंय. मात्र हाच धोनी मैदानाबाहेर सापळ्यात अडकला आहे. जवळच्या मित्राने दगाफटका केल्याने त्याच्यावर कोर्टात धाव घेण्याची वेळ आहे. महेंद्रसिंह धोनीची थोडीथोडकी नव्हे तर 15 कोटींची फसवणूक झाली आहे. महेंद्रसिंह धोनीने अरका स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडच्या मिहिर दिवाकर आणि सौम्या विशवॉश यांच्या विरोधात रांची कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. मिहिर दिवाकर धोनीचा जवळचा मित्र असून बिझनेस पार्टनरही होता. मिहिरने धोनीसोबत अनेक फोटो सोशल शेअरही केले आहेत, यातूनच त्यांची जवळीक किती होती हे अधोरेखित होतं. पण याच मित्राकडून फसवणूक झाल्याने धोनीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कोणत्या प्रकरणात कशी फसवणूक झाली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या काय झालं ते..

मिहिर दिवाकरने जगभरात क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी धोनीपुढे एक प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला सहमती दाखवत 2017 मध्ये महेंद्रसिंह धोनी याने एक करार केला होता. पण दिवाकरने या कराराचं उल्लंघन केल्याचं धोनीच्या लक्षात आलं. अरका स्पोर्ट्सला फ्रेंचायसीचं शुल्क आणि करारानुसार प्रॉफिटही शेअर करायचं होतं. पण ठरल्यानुसार काहीच घडलं नाही. विश्वासघात झाल्याचं महेंद्रसिंह धोनीला बऱ्याच वर्षांनी लक्षात आलं.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्ट 2021 ला अरका स्पोर्ट्सकडून अथॉरिटी लेटर परत घेतलं. धोनीने याप्रकरणी अनेक कायदेशीर नोटीसा देखील पाठवल्या. पण त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. मात्र कसलीच दाद मिळत नसल्याने अखेर कोर्टात धाव घ्यावी लागली. धोनीचे वकील दयानंद सिंह यांनी दावा केला की, अरका स्पोर्ट्सने फसवणूक केली असून धोनीचं जवळपास 15 कोटींचं नुकसान झालं.

दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2024 स्पर्धेतही खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व त्याच्याकडे असणार आहे. मिनी ऑक्शनमध्ये काही खेळाडूंना संघात घेण्यात आलं आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सची ताकद वाढली आहे. धोनीने सांगितलेले सर्व खेळाडू ऑक्शनमध्ये घेतल्याचं देखील व्यवस्थापनानं सांगितलं आहे.