टी-20 वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत इतिहास रचलाय. टी-२० वर्ल्ड कपवर टीम इंडियाने दुसऱ्यांदा नाव कोरलं आहे. तर आयसीसी ट्रॉफीचा गेल्या १३ वर्षांपासूनचा दुष्काळा रोहितनसेनेने संपवला आहे. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यामध्ये अखेर टीम इंडियाने विजय मिळवला. टीम इंडियाने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या साऊथ आफ्रिका संघाला 20 ओव्हरमध्ये 169 धावाच करता आल्या. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेतला. या ऐतिहासिक विजयानंतर टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने पोस्ट केली आहे.
माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते, तुम्ही शांत राहून आत्मविश्वास ठेवून जे काही केलं त्यासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन. सर्व भारतीयांकडून वर्ल्ड कप घरी परत आणल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. वाढदिवसाच्या अनमोल गिफ्टसाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद, असं महेंद्र सिंह धोनीने म्हटलं आहे.
महेंद्र सिंह धोनी याने आपल्या नेतृत्त्वाखाली टी-20 क्रिकेटमधील टीम इंडियाला पहिला वर्ल्ड कप 2007ला जिंकून दिला होता. त्यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड कपवर नाव कोरता आलेलं नव्हतं. त्यावेळी रोहित शर्मासुद्धा संघाचा सदस्य होता. आज त्याच रोहितने आपल्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने दुसरा वर्ल्ड कप जिंकून दिला आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.