भारताशी शत्रुत्व घेणाऱ्या शेजारी देशानं आता टीम इंडियाला केलं आमंत्रित, सेलिब्रेशनसाठी आखला असा प्लान

| Updated on: Jul 08, 2024 | 7:03 PM

टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर टीम इंडियावर सर्वत स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुठे सत्कार, कुठे बक्षीस असा कार्यक्रम गेल्या दहा दिवसांपासून सुरु आहे. मुंबईतील सेलिब्रेशन तर डोळे दिपवणारं ठरलं. आता भारताला डोळे दाखवणाऱ्या शेजारी देशानं टीम इंडियाला आमंत्रित केलं आहे. आधी भारताशी पंगा घेतला आणि आता उपरती झाल्यावर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न होत आहे.

भारताशी शत्रुत्व घेणाऱ्या शेजारी देशानं आता टीम इंडियाला केलं आमंत्रित, सेलिब्रेशनसाठी आखला असा प्लान
Follow us on

टी20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरताच टीम इंडियाने कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्णत्वास आलं. त्यामुळे टीम इंडियावर सर्वच स्तरातून कौतुकाच वर्षाव होत आहे. टीम इंडिया मायदेशी परतल्यावर चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त करून दाखवला. मग दिल्ली विमानतळापासून अगदी वानखेडे स्टेडियमपर्यंत टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत झालं. 11 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जेतेपद मिळवण्याचा आनंद काय असतो ते चाहत्यांनी दाखवून दिलं. टीम इंडियाच्या विजयानंतर भारताशी पंगा घेणारा देशही खूश झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारताला या ना त्या कारणाने डिवचत होता. मात्र भारतीय संघाला देशात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. मालदीवच्या या निमंत्रणामुळे भारतीय चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून भारत आणि मालदीवचे संबंध काही चांगले नाही. मालदीवच्या वागण्याने भारतीय टूरिस्ट नाराज झाले आहेत आणि पर्यटनातून हा देश वगळून दिला आहे. त्यामुळे मालदीवचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मालदीवने आता मलमपट्टी लावण्यासाठी टीम इंडियाला निमंत्रित केलं आहे.

मालदीव मार्केटिंग आणि पब्लिक रिलेशन कॉर्पोरेशन, मालदीव असोसिएशन ऑफ टूरिज्म इंडस्ट्रीने संयुक्तपणे वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला आपल्या देशात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. आपल्या निवेदनात सांगितलं की, ‘टीम इंडियाचा पाहुणचार करणं आणि त्यांच्या सोबत विजयाचं आनंद साजरा करणं हे सन्मानाची बाब आहे. मालदीवमध्ये आल्यानंतर खेळाडूंना आरामदायी, स्मरणात राहणारा आणि सुखद अनुभव मिळेल याची पूर्ण काळजी घेतली जाईल.’ मागच्या काही वर्षात मालदीव हे टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. खासकरून भारतीयांना या ठिकाणाचं आकर्षण आहे. भारतातून मालदीवमध्ये जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. पण जानेवारीत मालदीवच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि पर्यटकांनी पाठ फिरवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पाऊल उचललं. मात्र नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाचं मालदीवच्या मंत्र्‍यांनी खिल्ली उडवली. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. भारत सरकारने त्या वक्तव्यांची दखल घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हजारो पर्यटकांनी बॉयकॉट मालदीव असं करत टूर रद्द केले. त्याचा फटका मालदीवला बसला. आता पुन्हा एकदा मलमपट्टी लावण्याचं काम सुरु असून संबंध सुधारत आहेत. मागच्या महिन्यात मालदीवचे राष्ट्रपती नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण सोहळ्यात सहभागी झाले होते. आता टीम इंडिया मालदीवचं निमंत्रण स्वीकारते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.