Mayank Agarwal याचं रुग्णालयातून पहिलं ट्विट, काय म्हणाला?

| Updated on: Jan 31, 2024 | 3:31 PM

Mayank Agarwal Health Update | मयंक अग्रवाल याने विमानात पाणी समजून द्रव पदार्थाचं सेवन केलं. त्यानंतर मयंकला त्रास जाणवू लागला. त्यामुळे मयंकला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Mayank Agarwal याचं रुग्णालयातून पहिलं ट्विट, काय म्हणाला?
Follow us on

मुंबई | टीम इंडियाचा तडाखेदार सलामीवीर आणि कर्नाटकचा कर्णधार मंयक अग्रवाल त्रिपुरातील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. मयंक सूरतच्या प्रवासावेळेस आजारी पडला. मंयकच्या तोंडाला आणि घशाला जळजळ जाणवत होती. त्यामुळे मंयकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मयंकला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. एकाएकी मयंकला काय झालं? अशी चिंता क्रिकेट चाहत्यांना वाटू लागली. त्याला नक्की काय झालं हे तेव्हा कळू शकत नव्हतं. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचंही म्हटलं जात होतं. त्यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं.

रुग्णालय प्रशासनाने रात्री उशिराने मयंकच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. मंयकला कसलाही धोका नाही. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयंकला 31 जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात येऊ शकतो. या दरम्यान मयंकने रुग्णालयातून एक सोशल पोस्ट मीडिया पोस्ट केली आहे. मयंकची ही पोस्ट झपाट्याने व्हायरल झाली आहे.

मयंकच्या पोस्टमध्ये काय?

मयंकने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन स्वत:चे रुग्णालयातील 2 फोटो शेअर केले आहेत. मयंकने या पोस्टमध्ये आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. तसेच चाहत्यांचे आभार मानले आहेत. “मला आता बरं वाटतंय. मी कमबॅकसाठी तयारीला लागणार आहे. तुमच्या प्रार्थना, प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी आपला आभारी आहे”, अशा शब्दात मयंकने चाहत्यांना धन्यवाद दिलं.

नक्की प्रकरण काय?

मयंक रणजी ट्रॉफीत कर्नाटक टीमचा कॅप्टन आहे. कर्नाटक विरुद्ध त्रिपुरा यांच्यात 26 ते 29 जानेवारी दरम्यान हा पार पडला. त्यानंतर कर्नाटकचा पुढील सामना रेल्वे विरुद्ध 2 फेब्रुवारीला सुरतमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यासाठी कर्नाटक टीम आगरतळा येथून सूरतसाठी निघाली.

“तुमच्या प्रार्थना, प्रेम आणि समर्थनासाठी आभार”

कर्नाटक टीम प्रवासासाठी सज्ज झाली. मयंक आपल्या सीटवर बसला. मयंकच्या सीटवर एक द्रव पदार्थ होता. मयंक ते पाणी समजून प्यायला. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे आता मयंक सोबत हे ठरवून करण्यात आलंय का, अशी संशय व्यक्त केला जात आहे. मयंकच्या मॅनेजरकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात कसून चौकशी केली जात आहे. मात्र मयंकची प्रकृती स्थिर असल्याने चाहत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.