मुंबई | आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी आमनेसामने आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा सन्मानाचा असा आहे. मुंबई इंडियन्ससाठी जमेची बाजू म्हणजे हा सामना घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात पलटण आरसीबी विरुद्ध दोन हात करणार आहे. रोहित शर्मा आयपीएल इतिहासातील यशस्वी खेळाडू आणि कर्णधार आहे. रोहितने खेळाडू म्हणून 6 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर स्वत: रोहितने 2013 पासून कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन केलंय. मात्र या आयपीएल 16 व्या मोसमात रोहितची कामगिरी ही चिंतेचा विषय राहिली आहे. रोहितला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र रोहितचं आयपीएलमध्ये अपयशी ठरणं हे फायदेशीर आहे. तुम्ही म्हणाल कसं? सविस्तर जाणून घेऊयात.
रोहित 16 व्या हंगामात सलग 2 वेळा शून्यावर आऊट झाला आहे. रोहितने या मोसमात 20 पेक्षा कमी सरासरीने आणि 130 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. रोहितला हे आकडे शोभत नाहीत. मात्र रोहितने आयपीएल अपयशी ठरल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रामुख्याने आयसीसी स्पर्धेत तोडफोड कामगिरी केली आहे. त्यामुळे रोहित आयपीएलमध्ये अपयशी ठरणं हे टीम इंडियासाठी शुभसंकेत मानले जात आहेत.
टीम इंडिया आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. टीम इंडियाची या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढत होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हल ग्राउंडवर खेळणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अपयशी ठरल्यानंतर रोहितने या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनमध्ये खोऱ्याने धावा कराव्यात, अशीच अपेक्षा टीम इंडियाच्या चाहत्यांना असणार आहे. रोहितने आयपीएलमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर आयसीसी स्पर्धेत कशी कामगिरी केलीय, हे आपण पाहुयात.
रोहितने गेल्या 5 आयपीएल स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात कमबॅक केलंय. रोहितने आयपीएल 2017 मध्ये 23.78 च्या सरासरीने 333 धावा केल्या होत्या. मात्र आयपीएलनंतर झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीत रोहितचा धमाका पाहायला मिळला होता. रोहितने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीत 5 सामन्यात 76 च्या सरासरीने 304 धावा केल्या. रोहितने यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकं ठोकली होती.
रोहितला आयपीएल 2019 मध्येही विशेष काही करता आलं नाही. रोहितने आयपीएल 2019 मध्ये 15 सामन्यात 28.92 सरासरी आणि 130 पेक्षा कमी स्ट्राईक रेटने धावा केल्या. मात्र आयपीएलनंतर झालेल्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने 81 च्या सरासरीने 648 धावा झोडल्या. यामध्ये 5 शतकांचा समावेश होता.
रोहित आयपीएल 14 व्या मोसमात म्हणजे 2021 मध्येही फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये रोहितने खोऱ्याने धावा केल्या. रोहित या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. रोहितने 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये 34.79 च्या एव्हरेज आणि 150 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने 174 रन्स धावा केल्या.
मात्र रोहितला 2022 ला झालेल्या टी 20 वर्ल्ड कप आणि आयपीएल 15 व्या सिजनमध्ये धावा करता आल्या नाहीत. मात्र रोहितने 4 पैकी 3 वेळा आयपीएलमध्ये अपयश आल्यानंतर आयसीसी स्पर्धेत कमाल केली. त्यामुळे रोहितकडून यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये अशाच तडाखेदार कामगिरीची अपेक्षा राहिल. त्यामुळे रोहित यावेळेस उल्लेखनीय कामगिरी करत टीम इंडियाला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन करतो का, याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असेल.