मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील 31 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबईची सुरु असलेली विजयी दौड रोखली. मुंबईचा या मोसमातील पहिल्या सलग 2 सामन्यात पराभव झाला. त्यामुळे मुंबईला खोलवर ठेच पोहचली. यानंतर मुंबईने दणक्यात कमबॅक केलं. मुंबईने एकापाठोपाठ एक असे सलग 3 सामने जिंकले. मात्र यानंतर पंजाबने मुंबईचा कार्यक्रम केला. शनिवारी 22 एप्रिलला झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईला पराभूत केलं. अर्शदीप सिंह हा पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. अर्शदीप सिंह याने या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आणि पंजाबला विजय मिळवून दिला. अर्शदीपने 4 पैकी 2 विकेट्स या मुंबईच्या डावातील 20 व्या ओव्हरमध्ये घेतल्या. अर्शदीपने या दोन्ही विकेट्स घेताना मिडल स्टंप तोडला. एक घाव दोन तुकडे यानुसार अर्शदीपने 2 बॉल आणि 2 स्टंपचे 4 तुकडे केले. अर्शदीपच्या तोड कामगिरीमुळे बीसीसीआयला मात्र लाखोंचा फटका बसलाय.
पंजाबने पहिले खेळताना 8 विकेट्स गमावून 214 धावा केल्याने आणि मुंबईला 215 रन्सचं आव्हान मिळालं. मुंबई इंडियन्सनेही शानदार पद्धतीने या धावांचा पाठलाग केला. त्यामुळे मुंबईला 6 बॉलमध्ये 16 रन्सची गरज होती. अर्शदीप सिंह 20 वी ओव्हर टाकायला आला. पहिल्या बॉलवर टीम डेव्हिड याने एक रन काढली. त्यामुळे स्ट्राईकवर टिळक वर्मा आला. टिळकने दुसरा बॉल डॉट केला. तर तिसऱ्या बॉलवर टिळकला बोल्ड केलं. यात स्टंपचे 2 तुकडे झाले.
तोडू अर्शदीप सिंह
Stump breaker,
Game changer!Remember to switch to Stump Cam when Arshdeep Akram bowls ?#MIvPBKS #IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL | @arshdeepsinghh pic.twitter.com/ZnpuNzeF7x
— JioCinema (@JioCinema) April 22, 2023
अर्शदीप इतक्यावरच थांबला नाही. अर्शदीपने पुढील म्हणजेच चौथ्या बॉलवर नेहल वढेरा याची दांडी गुल केली. अर्शदीपने यावेळेसही मिडल स्टंप उडवला आणि त्याचेही 2 तुकडे केले. त्यामुळे पंजाबचा 13 धावांनी विजय झाला. पंजाबच्या विजयानंतर बीसीसीआयला लाखो रुपयांचा फटका बसला.
आयपीएल स्पर्धेत आधी साधे स्टंप वापरले जायचे. मात्र तंत्रज्ञान बदलंल तसं आयपीएलमध्येही बदल झाला. एलईडी लाईट असलेल्या स्टंपचा वापर सामन्यात करण्यात आला. बॉलचा स्पर्श होताच लाईट पेटते, हे या स्टंपचं वैशिष्टय. यामुळे फिल्ड अंपायर्सना निकाल घेण्यास मदत होते. या कारणामुळेच या स्टंप्सची किंमत जास्त असते. एका स्टंप्सच्या सेटची (3 स्टंप्स आणि बेल्स) किंमत जवळपास 32 लाख रुपयांच्या घरात आहे. अर्शदीपने 2 स्टंप्स तोडले. त्यामुळे बीसीसीआयला जवळपास 20 ते 23 लाख रुपयांच्या घरात फटका लागलाय. एवढ्या किंमतीत वन बीएचके घर मिळेल. आता याची नुकसान भरपाई करुन बीसीसीआय नवे स्टंप्स लावेल.
अर्शदीपने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये मुंबईच्या बॅटिंग ऑर्डर सत्यानाश केला. यामुळे पलटणच्या चाहत्यांचा घरच्या मैदानात हिरमोड झाला. अर्शदीपने 4 ओव्हरमध्ये 29 धावांच्या मोबदल्यात मुंबईच्या 4 गोलंदाजांना आऊट केलं. यामध्ये इशान किशन, सूर्यकुमार यादव या दोघांना निर्णायक क्षणी आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.