मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमात सलग दुसरा विजय मिळवला. मुंबईने वानखेडे स्टेडियममध्ये सलग दुसरा विजय साजरा केला. मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 7 विकेट्सने मात केली. आरसीबीने मुंबईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 27 बॉलआधी 15.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईच्या विजयानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या याने आनंद व्यक्त केला. तसेच रोहित शर्मा याच्याबाबत प्रतिक्रिया दिली. हार्दिक रोहितबाबत काय म्हणाला? जाणून घेऊयात.
रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामी जोडीने मुंबईच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी शतकी सलामी भागीदारी केली. ईशान किशन याने 34 बॉलमध्ये 69 धावांची खेळी केली. तर रोहित शर्मा याने 24 बॉल्समध्ये 38 रन्स ठोकल्या. या दोघांव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव याने विध्वंसक खेळी केली. सूर्याने 19 बॉलमध्ये 52 धावा चोपल्या. तिलक वर्मा याने 10 बॉलमध्ये नॉट आऊट 16 रन्स केल्या. तर कॅप्टन हार्दिक पंड्या याने विनिंग शॉट मारला. हार्दिकने 6 बॉलमध्ये नाबाद 21 रन्स ठोकल्या. हार्दिकने विजयानंतर आनंद व्यक्त करताना काय म्हणाला जाणून घेऊयात.
“जिंकण कायम चांगलं असतं. आम्ही ज्या पद्धतीने विजय मिळवला, ते फार प्रभावशाली होतं. इमपॅक्ट प्लेअर या पद्धतीमुळे आम्हाा गरजेच्या क्षणी अतिरिक्त बॉलर खेळवण्याची संधी मिळाली. ज्या पद्धतीने रोहित आणि इशानने बॅटिंग केली, त्यामुळे आमच्यासाठी व्यासपीठ तयार केलं. आमच्यासाठी सामना लवकर संपवणं आवश्यक होते. आम्ही याबाबत काहीच बोललो नाही, हे टीमचं वैशिष्टय आहे. खेळाडूंना परिस्थिती काय आहे हे माहित आहे. विजयी आव्हान कमी असल्याचं पाहिलं तेव्हा नेट रनरेट सुधारण्यासाठी सामना लवकर संपवण्याचा विचार केला”, असं हार्दिक म्हणाला. तसेच पंड्याने बुमराहचंही कौतुक केलं.
जसप्रीत बुमराह आमच्या टीममध्ये आहे हे आमचं भाग्य आहे, असंही पंड्याने म्हटलं. बुमराहने मुंबईकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. बुमराहने विकेट्सचा पंजा उघडला. बुमराहची आयपीएलमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ ठरली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी आणि आकाश मधवाल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार वैशाख, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.