मुंबई : वुमन्स आयपीएलच्या पहिल्या पर्वामध्ये मुंबई इंडिअन्सच्या संघाने फायनल प्रवेश केला आहे. यूपी वॉरिअर्स संघाचा 72 धावांनी पराभव करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. मुंबईने यूपीला विजायासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इस्सी वाँग हीने घेतलेल्या हॅटट्रिकमुळे यूपीचा संघ 110 धावांवर ऑलआऊट झाला. मात्र पराभूत कर्णधार अलिसा हिलीने सामना कुठे गमावला ते सांगितलं आहे.
आम्ही नॅट स्किव्हरला 6 धावांवर झेलबाद केले असते, तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. आम्ही फलंदाजीही हवी तशी करू शकलो नाहीत. धावा करताना अजिबात गती मिळवू शकलो नाही. धावा चेस करण्यात आमचा संघ चांगला आहे. पण आज आम्ही सर्वोत्तम खेळ केला नाही. आम्ही गेल्या वेळी मुंबईविरुद्ध सर्वोत्तम खेळ केला. खरं सांगायचं या स्पर्धेत आम्ही शेवटपर्यंत टिकून राहिलो ही आमची ताकद आहे. पण दुर्दैव आहे की आम्ही अंतिम फेरीत पोहोचू शकलो नसल्याचं अलिसा हिली म्हणाली.
अंतिम फेरीत मुंबई आणि दिल्ली तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. पण मुंबईच्या गोलंदाजासमोर 18 षटकात सर्वबाद 105 धावा करता आल्या. मुंबईने हे आव्हान 15 व्या षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. मुंबईने दिल्लीवर 8 गडी आणि 30 चेंडू राखून विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात दिल्लीने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकात मुंबईला 109 धावांवर रोखलं. इतकंच काय तर जबरदस्त फलंदाजी करत दिल्लीने हे आव्हान 9 षटकात पूर्ण केलं. त्यामुळे धावगतीत चांगलाच फरक पडला. मुंबई आणि दिल्लीचे समगुण असूनही दिल्लीची वर्णी थेट अंतिम फेरीत लागली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.
यूपी वॉरियर्स प्लेइंग इलेव्हन | अलिसा हिली (विकेटकीपर आणि कॅप्टन), श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, पार्श्वी चोप्रा आणि राजेश्वरी गायकवाड