IND vs NZ : न्यूझीलंड कसोटी सामन्यात निर्णय चुकला का? अखेर रोहित शर्माने दिली जाहीर कबुली, म्हणाला…

| Updated on: Oct 17, 2024 | 8:25 PM

भारत न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका असून पहिला सामना सुरु आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडिया पराभवाच्या वेशीवर उभी असल्याचं दिसत आहे. कारण पहिला दिवस पावसामुळे वाया गेला आणि दुसरा दिवशी भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांवर बाद झाला. त्यात न्यूझीलंडकडे मजबूत आघाडी आहे. यानंतर कर्णधार रोहित शर्माने आपली नेमकी काय चूक झाली ते सांगितलं.

IND vs NZ : न्यूझीलंड कसोटी सामन्यात निर्णय चुकला का? अखेर रोहित शर्माने दिली जाहीर कबुली, म्हणाला...
Image Credit source: BCCI
Follow us on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी महत्त्वाची मालिका न्यूझीलंड आणि भारत यांच्यात होत आहे. या मालिकेतील निकालावर भारताचं अंतिम फेरीचं गणित ठरणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाच सामन्याचा पेपर कठीण असणार आहे. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकून भार हलका करण्याचा मानस होता. मात्र पहिल्याच सामन्यात सर्वच उलट झालं. न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकूनही रोहित शर्मा मोठी चूक करून बसला. नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इथेच काय तो निर्णय चुकला. फलंदाज एक एक करत खेळपट्टीवर हजेरी लावून येत होते. इतकंच काय तर पाच फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे टीम इंडियाची ही स्थिती पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. रोहित शर्माच्या एका चुकीमुळे टीम इंडियाला फटका बसल्याचं दिसत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्माने आपल्या चुकीची जाहीर कबुली दिली.

रोहित शर्माने सांगितलं की, खेळपट्टीचा अंदाज घेण्यात फार मोठी चूक झाली. रोहित शर्माने जाहीर कबुली दिली की, खेळपट्टीचा अभ्यास करता आला नाही. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिलं सत्र कठीण जाईल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. “आम्हाला वाटलं की खेळपट्टीवर जास्त गवत नाही. आम्ही विचार केला की पहिल्या सत्रात जे काही व्हायचं ते होऊ दे. त्यानंतर खेळ जसा पुढे जाईल तसा खेळपट्टीचा अंदाज बदलेल. जेव्हा आम्ही भारतात खेळतो तेव्हा पहिलं सत्र कठीण जातं. त्यानंतर खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करू लागते.”

“मला वाटलं की खेळपट्टीवर जास्त गवत नव्हतं. त्यामुले वाटलं की कुलदीप यादवला प्लेइंग 11 मध्ये सामिल केलं पाहीजे. कारण कुलदीपने सपाट खेळपट्टीवरही गोलंदाजी केली आहे आणि तो विकेटही घेतो.”, असं कर्णधार रोहित शर्माने सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड टीम: टॉम लॅथम (कर्णधार), डेवोन कॉन्वे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेनरी, टिम साउदी, एजाज पटेल आणि विलियम ओरोर्के.