चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होणार आहे. यासाठी प्रस्ताविक वेळापत्रक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे सोपवलं आहे. असं असताना भारताने पाकिस्तानात क्रिकेट संघ पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळावी यावर जोर दिला जात आहे. पण पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेऊन स्पर्धा पाकिस्तानातच होणार हे स्पष्ट केलं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाण्यास काहीच गैर नसल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने क्रीडा आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबरला हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले. 2008 आशिया कप स्पर्धेनंतर भारताने पाकिस्तान दौरा केलेला नाही. दोन्ही देशांनी 2012-13 मध्ये शेवटची क्रिकेट मालिका खेळली. त्यानंतर दोन्ही संघ आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत आमनेसामने येतात.
बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे. भारतीय संघाचा पाकिस्तान दौरा हा केंद्र सरकारच्या आदेशावर अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. असं असताना आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत अजब विधान केलं आहे. ‘2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला अचानक भेट देऊन आले आणि नवाब शरीफ यांच्यासोबत बिर्याणी खाल्ली. जर ते चुकीचं नाही तर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला जाण्यात काहीच गैर नाही.’ , असं वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केलं आहे. तेजस्वी यादव राजकारणात येण्यापूर्वी क्रिकेटपटू होते आणि आयपीएल स्पर्धेत खेळले आहेत.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा 19 फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होणार आहे. प्रस्ताविक वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तानचा सामना 1 मार्चला ठरवला गेला आहे. मात्र त्यावर अधिकृत अशी मोहोर लागलेली नाही. भारताने आशिया कप स्पर्धाही हायब्रिड मॉडेलवर खेळली होती. त्यामुळे आयसीसी स्पर्धेतही या मॉडेलचा अवलंब करावा असा आग्रह बीसीसीआयने आयसीसीकडे धरला आहे. मात्र पाकिस्तान माघार घेण्यास तयार नाही. जर भारतीय संघ आयसीसी स्पर्धेसाठी पाकिस्तानात गेला नाही तर श्रीलंकेला संधी मिळू शकते.