रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने भ्रमनिरास केला आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही पराभवाचं सावट आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच गणित फिस्कटणार आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही पहिल्या डावात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यात गोलंदाजांना झटपट विकेट बाद करण्यात अपयश येत आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडकडे 103 धावांची आघाडी होती. त्यात दुसऱ्या डावात 5 गडी गमवून 198 धावा केल्या आणि 301 धावा आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी हमखास 400 पार धावा होतील असं दिसत आहे. 400 धावांचा पाठलाग करणं टीम इंडियाला जमेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच पैकी तीन सामने जिंकावे लागतील अशी स्थिती आहे. ऑस्ट्रेलियात जाऊन अशी कामगिरी करणं किती कठीण आहे याचा अंदाज क्रीडाप्रेमींना आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगते की काय असा भीती क्रीडाप्रेमींना सतावत आहे. असं असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत एक अपडेट समोर आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, मोहम्मद शमी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगालकडून खेळणार असल्याचं सांगितलं जात आहे. रणजी ट्रॉफीत मोहम्मद शमी दोन सामने खेळेल असं सांगितल आहे. या दोन सामन्यांनंतर मोहम्मद शमीचं ऑस्ट्रेलियाचं तिकीट कन्फर्म होणार आहे. द इंडियन एक्स्प्रेसशी बंगालचे कोच लक्ष्मी रत्न शुक्ला यांनी सांगितलं की, ‘शमी केरळविरुद्धच्या सामन्यात नसेल. पण कर्नाटक आणि मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची आशा आहे.’
मोहम्मद शमी 2023 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास एक वर्ष मोहम्मद शमी क्रिकेटपासून दूर आहे. रिकव्हरी करताना त्याच्या गुडघ्याला सूज आल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याचं कमबॅक कठीण असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने आधीच सांगितलं आहे की, दुखापतग्रस्त शमीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचं नाही. त्यामुळे रणजी ट्रॉफीच्या दोन सामन्यावर सर्वकाही ठरणार आहे.