भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला असून पुन्हा एकदा क्रिकेट मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. पण श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची निवड झालेली नाही. असं असलं तरी निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने त्याच्या कमबॅकबाबत चांगली बातमी दिली आहे. सप्टेंबर महिन्यात पदार्पण करण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. असं असताना त्याच्या जवळच्या मित्राने एक धक्कादायक खुलासा केला आहे. मोहम्मद शमी आत्महत्या करण्याच्या विचारात होता असं त्याने सांगितलं आहे. त्यामुळे शमीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मोहम्मद शमीचा जवळचा मित्र उमेश कुमार याने ही माहिती उघड केली आहे. उमेश कुमारने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्ट अनप्लग्डमध्ये याबाबतची माहिती दिली. त्याने सांगितलं की, ‘त्याच्यावर फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर आतून एकदम कोलमडून गेला होता.’ पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर हे गंभीर आरोप केल्याने खचला होता. उमेश कुमारने पॉडकास्टवर शमीच्या त्या वेळेच्या स्थितीबाबत सांगितलं.
मोहम्मद शमी त्या वेळेस उमेश कुमारच्या घरीच राहात होता. त्यावेळेस त्याच्यावर एकामागून एक संकटं कोसळली होती. पण पाकिस्तानसोबत मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे एकदम कोलमडून गेला होता. फिक्सिंगच्या आरोपांमुळे अस्वस्थ झाला होता. उमेशच्या मते, शमीने सांगितलं होतं की कोणताही आरोप सहन करेन पण देशाची फसवणूक केल्याचा आरोप सहन करणार नाही.
उमेशने पुढे सांगितलं की, फिक्सिंगच्या आरोपांनंतर त्या रात्री शमी काहीतरी वाईट करण्याचा विचार करत होता असं माध्यमांमध्येही आलं आहे. खरं तर त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार होता. सकाळी चार वाजता पाणी पिण्यासाठी उठलो होतो. किचनकडे जात होतो. तेव्हा मी शमीला 19व्या मजल्यावर असलेल्या माझ्या घराच्या बालकनीत उभं पाहिलं. मी समजून गेलो की काय चाललं आहे? ती रात्र शमीच्या आयुष्यातील काळरात्र होती.
उमेश कुमारने पुढे सांगितलं, दुसऱ्या दिवशी मोहम्मद शमीला मोबाईलवर एक मेसेज आला. त्यात त्याला क्लिन चीट मिळाली होती. तुम्ही विचार करू शकणार नाही त्यावेळेस शमी किती खूश झाला होता. हा आनंद त्याच्यासाठी वर्ल्डकप जिंकल्यासारखा होता.