ICC world cup 2023 Venue | महत्वाचे सामने अहमदाबादमध्ये, हा खासदार संतापला, म्हणाला..

| Updated on: Jun 27, 2023 | 4:37 PM

Icc World Cup 2023 Schedule | वनडे वर्ल्ड कपमधील पहिला आणि शेवटचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या वेळापत्रकावरुन खासदाराने आक्षेप घेतला आहे.

ICC world cup 2023 Venue | महत्वाचे सामने अहमदाबादमध्ये, हा खासदार संतापला, म्हणाला..
Follow us on

मुंबई | ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आयसीसीने वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारताला या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. या स्पर्धेचं आयोजन हे 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. एकूण 46 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेतील पहिली मॅच ही 2019 मधील वर्ल्ड कप विजेता इंग्लंड विरुद्ध उपविजेत्या न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.

विशेष बाब म्हणजे या स्पर्धेतील पहिला आणि शेवटचा अंतिम सामन्याचं आयोजन हे गुजरात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या वेळापत्रकावरुन आणि अहमदाबादच्या मुद्द्यावरुन एका खासदाराने आक्षेप घेतला आहे. या खासदाराने ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. या खासदाराचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपूरमचे खासदार शशी थरुर यांनी ट्विट करत वर्ल्ड कप सामन्यांच्या ठिकाणावरुन संताप व्यक्त केलाय. तसेच थरुर यांनी वेळापत्रकावरुन नाराजी व्यक्त केलीय.

थरुर यांच्या ट्विटमध्ये काय?

“तिरवनंतपूरम स्टेडियमची देशातील सर्वश्रेष्ठ स्टेडियममध्ये गणना होते. या स्टेडियममध्ये वर्ल्ड कप स्पर्धेच्या एकाही सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं नाही. हे पाहून फार निराशा झाली. अहमदाबाद देशातील क्रिकेटची राजधानी म्हणून नावारुपास येत आहे. तिरवनंतपूरममध्ये काय 1 किंवा 2 सामन्यांचं आयोजन करता आलं नसतं का?”, असा सवाल विचारत थरुर यांनी ट्विटमधून आपला रोष व्यक्त केलाय.

शशी थरुर यांचं ट्विट

दरम्यान या 46 दिवसात एकूण 45 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपमधील सामने हे एकूण 13 शहरात आयोजित करण्यात आले आहेत. मात्र 10 शहरांमध्येच मुख्य सामने खेळवण्यात येणार आहेत. तर हैदराबाद, गुवाहाटी आणि तिरुवनंतपूरममध्ये केवळ सराव सामने होणार आहेत. सराव सामने 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत खेळवण्यात येणार आहेत. या मुदद्यावरुनच शशी थरुर यांनी ट्विटद्वारे आपला राग व्यक्त केला आहे.

जागा 2 टीम 10

दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये आमनासामना होणार आहे, त्यापैकी 8 संघांना थेट एन्ट्री मिळाली आहे. या 8 संघांमध्ये टीम इंडिया, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. तर उर्वरित 2 संघ आयसीसी क्वालिफायर पात्रता फेरीतून येतील. या 2 जागांसाठी झिंबाब्वे, श्रीलंका, वेस्टइंडिज, आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलँड, नेपाळ, यूएई, अमेरिका आणि ओमानचा समावेश आहे.