पुणे | महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेतील 8 व्या क्रिकेट सामन्यात केदार जाधव याच्या नेतृत्वात कोल्हापूर टस्कर्सने सोलापूर रॉयल्सवर 26 धावांनी विजय मिळवलाय. कोल्हापूरचा हा 3 सामन्यांमधील सलग दुसरा विजय ठरलाय. कोल्हापूरने कॅप्टन केदार जाधव याच्या 85 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 186 धावा केल्या. त्यामुळे सोलापूरला विजयासाठी 187 धावांचं आव्हान मिळालं. मात्र कोल्हापूरच्या गोलंदाजांनी सोलापूरला 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 160 धावाच करता आल्या.
सोलापूर रॉयल्सकडून प्रवीण देशेट्टी याने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. अथर्व काळे याने 32* आणि मेहुल पटेल याने 22 धावांची खेळी केली. तर स्वप्नील फुलपगार याने 19 धावांचं योगदान दिलं. या चौघांव्यतिरिक्त इतर 4 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर सुनील यादव 1 धावेवर नाबाद परतला.
कोल्हापूरकडून मनोज यादव याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अत्मान पोरे याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अक्षय दरेकर आणि निहाल तुस्माद या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी सोलापूर रॉयल्सने टॉस जिंकून कोल्हापूरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कोल्हापूरने या निर्णयाचा फायदा घेतला. कॅप्टन केदार जाधव याने 52 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 11 चौकारांच्या मदतीने 85 धावांची धमाकेदार खेळी केली. अंकित बावने याने 47 बॉलमध्ये 9 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 63 धावा केल्या.
साहिल औताडे याने 21 धावांचं योगदान दिलं. तर दोघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. तर कीर्तीराज वाडेकर आणि सिद्दार्थ म्हात्रे 1 धावेवर नाबाद परतले. कोल्हापूरकडून प्रथमेश गावडे याने 2 विकेट्स घेतल्या. तर सुनील यादव, सत्यजीत बच्छाव आणि प्रणय सिंह या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कोल्हापूर टस्कर्स प्लेइंग इलेव्हन | केदार जाधव (कॅप्टन आणि विकेटकीपर), अंकित बावणे, नौशाद शेख, कीर्तीराज वाडेकर, सिद्धार्थ म्हात्रे, साहिल औताडे, तरणजितसिंग ढिल्लोन, अक्षय दरेकर, मनोज यादव, श्रेयश चव्हाण, आत्मा पोरे आणि निहाल तुसमद.
सोलापूर रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | सत्यजीत बच्छाव (कॅप्टन), यश नहार, प्रवीण देशेट्टी, विशांत मोरे (विकेटकीपर), रुषभ राठोड, स्वप्नील फुलपगार, सुनील यादव, विकी ओस्तवाल, मेहुल पटेल, प्रथमेश गावडे, प्रणय सिंग आणि अथर्व काळे.