अजिंक्य रहाणे याच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर मुंबई क्रिकेट टीमने सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईने हा सामना 6 विकेट्सने जिंकला आहे. बडोदाने मुंबईला विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. मुंबईने 17.2 ओव्हरमध्ये 164 धावा केल्या. अजिंक्य रहाणे मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रहाणेने या हंगामात सलग तिसरं अर्धशतक ठरलं. तर रहाणेचं अवघ्या 2 धावांसाठी शतक हुकलं. मात्र रहाणेने या खेळीसह मुंबईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. तर कॅप्टन श्रेयस अय्यर याने 46 धावांची खेळी करत रहाणेला चांगली साथ दिली. आता अंतिम फेरीत मुंबईचा सामना हा दिल्ली विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यीतल विजयी संघाविरुद्ध होणार आहे.
पृथ्वी शॉ आणि अजिंक्य ही सलामी जोडी मैदानात आली. मुंबईने 30 धावांवर पहिली विकेट गमावली. पृथ्वी 9 बॉलमध्ये 8 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर रहाणे आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. रहाणेने या दरम्यान सलग तिसरं अर्धशतक ठोकलं. तर श्रेयसही अर्धशतकाच्या जवळ आला होता. मात्र त्याचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी अधुरं राहिलं. श्रेयस 30 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह 46 धावा करुन आऊट झाला.
श्रेयसनंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. मात्र सूर्याने रहाणेला अधिक खेळण्याची संधी दिली. रहाणेने या संधीचा फायदा घेत चौकार षटकार ठोकले.रहाणे आता शतकासह मुंबईला विजयी करणार असंच चित्र होतं. मात्र डाव उलटा पडला. विजयासाठी 1 आणि शतकासाठी 2 धावांची गरज असताना घात झाला. रहाणेने नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. रहाणे 98 धावांवर आऊट झाला. रहाणेने 56 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 11 फोरसह 98 धावा केल्या. रहाणेनंतर दुसऱ्याच बॉलवर सूर्यकुमार यादव 1 धाव करुन माघारी परतला. त्यामुळे मुंबईची 158-2 वरुन 158-4 अशी स्थिती झाली. त्यानंतर विजयासाठी 1 धाव पाहिजे असताना सूर्यांश शेडगे याने सिक्स ठोकून मुंबईला विजयी केलं. सूर्यांशने नाबाद 6 धावा केल्या. तर शिवम दुबे 1 बॉल खेळून नॉट आऊट परतला.
बडोदा प्लेइंग इलेव्हन : कृणाल पंड्या (कर्णधार), शाश्वत रावत, अभिमन्यू सिंग राजपूत, हार्दिक पांड्या, शिवालिक शर्मा, भानू पानिया, विष्णू सोलंकी (विकेटकीपर), अतित शेठ, महेश पिठिया, लुकमान मेरीवाला आणि आकाश महाराज सिंग.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि अथर्व अंकोलेकर.