श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट टीमने दणक्यात सुरुवात केली आहे. मुंबईने विजय हजारे ट्रॉफी राउंड 6 सामन्यात पुद्देचरीचा 163 धावांनी धुव्वा उडवला आहे. मुंबईचा हा या स्पर्धेतील सहा सामन्यांमधील चौथा विजय ठरला आहे. मुंबईने कॅप्टन श्रेयस अय्यर याच्या शतकी खेळीच्या जोरावर 290 धावांपर्यंत मजल मारली. मात्र पुद्देचरीचे फलंदाज मुंबईच्या धारदार गोलंदाजांसमोर ढेर ठरले. मुंबईने पुद्देचरीला 27.2 ओव्हरमध्ये 127 धावांवर गुंडाळलं. मुंबईने यासह हा सामना जिंकला. शतक करणारा श्रेयस सामनावीर ठरला.
पुद्देचरीकडून फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. आकाश करगावे याने सर्वाधिक धावा केल्या. करगावने 100 च्या स्ट्राईक रेटने 54 धावा केल्या. संतोष रत्नपारखेने 21 धावांचं योगदान दिलं. अमन खान याने 15 आणि नेयान कांगयान याने 10 धावा जोडल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी त्याव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठू दिला नाही. मुंबईकडून शार्दूल ठाकुर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.सूर्यांश शेडगे आणि आयुष म्हात्रे या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हर्षित तन्ना, अर्थव अंकोलेकर आणि विनायक भोईर या तिघांनी प्रत्येकी 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
त्याआधी मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मुंबईच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी निराशा केली. अंगकृष रघुवंशी 0 आणि सूर्यकुमार यादव दोघेही गोल्डन डक ठरले. आयुष म्हात्रे याला 1 धावच करता आली. सिद्धेश लाड याने 34 तर हार्दिक तामोरे याने 11 धावा केल्या. त्यामुळे मुंबईची स्थिती 5 बाद 89 अशी झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर आणि अर्थव अंकोलेकर या जोडीने मुंबईला सावरलं आणि 290 धावांपर्यंत पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली.
अर्थवने 47 बॉलमध्ये 43 धावा केल्या. सूर्यांश शेडगे याने 10 धावा केल्या. शार्दूल ठाकुर 16 धावा करुन माघारी परतला. विनायक भोईरने 8 धावांचं योगदान दिलं. तर हर्ष तन्ना श्रेयस अय्यरसह नाबाद परतला. हर्षने नाबाद 1 धाव केली. तर श्रेयसने 133 बॉलमध्ये 16 फोर आणि 4 सिक्ससह आऊट 137 रन्स केल्या. पुद्देचरीकडून एकूण चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर एका गोलंदाजाने 1 विकेट मिळवली. दरम्यान मुंबईचा सातवा आणि अखेरचा सामना हा सौराष्ट्रविरुद्ध 5 जानेवारी रोजी होणार आहे.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगकृष्ण रघुवंशी, आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकूर, हर्ष तन्ना आणि विनायक भोईर.
पुद्दुचेरी प्लेइंग ईलेव्हन : नयन श्याम कांगायन, अरुण कार्तिक (कर्णधार आणि विकेटकीपर), मोहम्मद आकिब जावाद, संतोष रत्नपारखे, जशवंत श्रीराम, अमन हकीम खान, अंकित शर्मा, सिदक गुरविंदर सिंग, गौरव यादव, सागर उदेशी आणि आकाश करगावे.