मुंबई | अंजिक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबईने इतिहास रचला आहे. मुंबईने तामिळनाडू विरुद्धच्या उंपात्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात धमाकेदार विजय मिळवला आहे. मुंबईने तामिळनाडूवर 1 डाव आणि 70 धावांनी मात करत विजय मिळवला आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानात करण्यात आलं होतं. मुंबईने या विजयासह रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईची रणजी ट्रॉफी फायनलमध्ये पोहचण्याची ही 48 वी वेळ ठरली आहे. शार्दूल ठाकुर हा मुंबईच्या विजयाच्या खरा नायक ठरला.
तामिळनाडूने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी तामिळनाडूचं 150 च्या आत पॅकअप केलं. तामिळनाडूचा पहिला डाव हा 64.1 ओव्हरमध्ये 146 धावांवर आटोपला. तामिळनाडूकडून विजय शंकर याने 44 आणि वॉशिंग्टन सुंदर याने 43 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त मुंबईच्या गोलंदाजासमोर एकाचाही निभाव लागला नाही. मुंबईकडून तुषार देशपांडे याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मुशीर खान शार्दूल ठाकुर आणि तनुष कोटीयन या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मोहित अवस्थी याला 1 विकेट मिळाली.
मुंबईची तामिळनाडूच्या 146 धावांच्या प्रत्युत्तरात अडखळत सुरुवात झाली. टॉप ऑर्डरमधील मुशीर खान याच्या 55 धावांचा अपवाद वगळता इतरांनी घोर निराशा केली. त्यामुळे मुंबईची घसरगुंडी झाली होती. मात्र अखेरीस हार्दिक तामोरे, शार्दूल ठाकुर, तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे या चौघांनी केलेल्या कामगिरीमुळे मुंबईला 350 पार मजल मारता आली.
मुंबईकडून शार्दूल ठाकुर याने निर्णायक क्षणी 109 धावांची खेळी केली. शार्दूलचं हे फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक ठरलं. शार्दुलनंतर तुषार देशपांडे याने 26 धावा केल्या. तर तनुष कोटीयन याने नाबाद 89 धावांची खेळी केली. मुंबईचा पहिला डाव हा 378 धावांवर आटोपला. मुंबईने यासह 207 धावांची मजबूत आघाडी घेतली. तामिळनाडूकडून कॅप्टन साई किशोर याने 6 विकेट्स घेतल्या. कुलदीप सेन याने दोघांना आऊट केलं. तर वॉरियर आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
मुंबईची फायनलमध्ये धडक
𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 𝐜𝐫𝐮𝐢𝐬𝐞 𝐢𝐧𝐭𝐨 𝐭𝐡𝐞 𝐟𝐢𝐧𝐚𝐥! 👏
A superb performance from the @ajinkyarahane88-led side as they beat Tamil Nadu by an innings and 70 runs in Semi Final 2 of the @IDFCFIRSTBank #RanjiTrophy 🙌#MUMvTN | #SF2
Scorecard ▶️ https://t.co/9tosMLk9TT pic.twitter.com/bOikVOmBn1
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 4, 2024
तामिळनाडूने 207 धावांच्या प्रत्युत्तरात दुसऱ्या डावातील बॅटिंगला सुरुवात केली. शार्दूल ठाकुरने तामिळनाडूला झटपट 2 धक्के देत मुंबईला जोरदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर मोहित अवस्थी याने वॉशिंग्टन सुंदरला 4 धावांवर आऊट केलं. त्यामुळे तामिळनाडूची स्थिती 3 बाद 10 अशी झाली. मात्र त्यानंतर मधल्या फळीतील चौघांनी डाव थोड्या वेळ सावरुन धरला.
बाबा इंद्रजिथ याने 70, प्रदोष पॉल 25, विजय शंकर याने 24 आणि कॅप्टन आर साई किशोर याने 21 धावा केल्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईने जोरात कमबॅक केलं आणि तामिळनाडूला 170 धावांच्या आत रोखलं. मुंबईने तामिळनाडूला 162 धावांवर ऑलआऊट करत डाव आणि 70 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात मुंबईकडून शम्स मुलानी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी आणि तनुष कोटीयन या तिघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, भूपेन लालवाणी, मुशीर खान, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे.
तामिळनाडू प्लेईंग ईलेव्हन | रविश्रीनिवासन साई किशोर (कॅप्टन), एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन, बाबा इंद्रजीथ, प्रदोष पॉल, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, एम मोहम्मद, एस अजित राम, संदीप वॉरियर आणि कुलदीप सेन.