मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना खेळवण्यात येत आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला. कॅप्टन रोहित शर्मा याने आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. हा सामना दोन्ही संघांसाठी आरपारचा आहे. दोन्ही संघ या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधीच्या सामन्यात आरसीबीने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा विजय मिळवून मागील पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवलाय. तर तेवढ्याच मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. मात्र या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने आगामी मोसमातील रणजी ट्रॉफीसाठी कोलकाता नाईट रायडर्स टीमचा सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक ओंकार साळवी याच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे. साळवी याची मुंबईच्या मुख्यपदी प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे. मुंबईचा माजी फलंदाज विनीत इंदुलकर याची बॅटिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ओंकार गुरव याची फिल्डिंग कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुंबईचा माजी ओपनर बॅट्समन विनायक माने याची एमसीएच्या बॅटिंग कोच म्हणून निवड केली गेली आहे. एमसीएच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी एकूण 7 जणांनी अर्ज केला होता. या क्रिकेट सुधार समितीने साळवी यांची निवड केली.याआधी साळवी यांनी मुंबई टीमच्या बॉलिंग कोचची जबाबदारी यशस्वीरत्या पार पाडली होती.
हेड कोच पदासाठी मुंबईचे माजी प्रशिक्षक विनायक सामंत, विनायक माने, अतुल रानडे, भारताचे माजी विकेट विकेटकीपर समीर दिघे, उमेश पटवाल आणि प्रदीप सुंदरम यांनी अर्ज केला होता. एमसीए या पदासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होती.
या दरम्यान समीर दिघे यांची अकादमीच्या प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. तर राजेश पवार यांची मुंबई अंडर 23 संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली गेली आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचे कोच दिनेश लाड हे अंडर 19 संघाचे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.