मुंबई | आयपीएल 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. सलामीचा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. तर मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना हा 23 मार्च रोजी खेळणार आहे. यंदा हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्संच नेतृत्व करणार आहे. हार्दिक पहिल्याच सामन्यात आपल्या आधीच्या संघाविरुद्ध अर्थात गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे. या 17 व्या हंगामाआधी मुंबईने रोहित शर्मा याच्याकडून कर्णधारपद काढून हार्दिक पंड्या याला दिलं. आता पहिल्या सामन्याआधी मुंबईमध्ये 2 गट पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल 17 व्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्याआधी मुंबई इंडियन्स आपसातच सराव म्हणून सामना खेळणार आहे. माहितीनुसार, या सामन्यात रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या हे दोघे दोन्ही संघांचं नेतृत्व करणार आहेत. सरावाच्या दृष्टीने हा सामना आयोजित करण्यात आला आहे. हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये पार पडणार आहे. हा सामना पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सने 3 हजार क्रिकेट चाहत्यांना आमंत्रित केल्याचं माहिती आहे.
मुंबई इंडियन्समध्ये 17 व्या हंगामासाठी एकूण 25 खेळाडू आहेत. त्यापैकी 7 खेळाडू हे परदेशी आहेत. तर उर्वरित भारतीय खेळाडू आहेत. आता या इंट्रा स्क्वाड सामन्यामुळे प्रत्येक खेळाडूचा चांगला सरावही होईल. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या दुखापतीतून आताही पूर्णपणे बरा झालेला नाही. बंगळुरुतील एनसीएमध्ये 19 मार्च रोजी सूर्याची फिटनेस टेस्ट पार पडली. सूर्या या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला. आता पुढील टेस्ट ही 21 मार्च रोजी पार पडणार आहे. आता या फिटनेस टेस्टकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सूर्यासाठी ही फिटनेस टेस्ट आयपीएलच्या 17 व्या मोसमाच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाची आहे.
मुंबई इंडियन्समध्ये सराव सामना
आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स | हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णु विनोद, अर्जुन तेंडूलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमारियो शेफर्ड, जेराल्ड कोएट्जे, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमनधीर सिंह, अंशुल कंबोज, शिवालिक शर्मा आणि मोहम्मद नबी.