अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट टीमने इतिहास रचला आहे. मुंबईने सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर 27 वर्षांनी इराणी कपवर नाव कोरलं आहे. मुंबईची इराणी कप जिंकण्याची ही 15 वी वेळ ठरली आहे. मुंबईकडून या स्पर्धेत पहिल्यांदाच द्विशतक करणारा सर्फराज खान हा ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराचा मानकरी ठरला. तर मुंबईकडून दुसऱ्या डावात तनुष कोटीयन याने शतकी खेळी केली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. अजिंक्य रहाणे याने मुंबईला आपल्या नेतृत्वात रणजी ट्रॉफीनंतर इराणी कप जिंकून आपला दबदबा कायम ठेवला आहे.
सर्फराज खान आणि तनुष कोटीयन ही जोडी मुंबईच्या विजयाची शिल्पकार ठरली. तनुषने दुसऱ्या डावात मुंबईचा डाव गडगडलेला असताना पहिलवहिलं शतक झळकावलं. तनुषच्या या शतकी खेळीने मुंबईचा डाव सावरला. मुंबईने पहिल्या डावात 121 धावांची आघाडी मिळवली होती. मात्र दुसऱ्या डावात मुंबईची 8 बाद 171 अशी स्थिती झाली होती. मुंबईसाठी एकट्या पृथ्वी शॉ याचा अपवाद वगळता टॉप आणि मिडल ऑर्डरमधील सर्वच अपयशी ठरले. पृथ्वीने 76 धावा केल्या.
रेस्ट ऑफ इंडियाच्या सारांश जैन याने चौथ्या दिवशी मुंबईला झटके देत बॅकफुटवर ढकललं होतं. मात्र त्यानंतर तनुष कोटीयन आणि मोहित अवस्थी या दोघांनी नवव्या विकेटसाठी 158 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे मुंबई मजबूत स्थितीत पोहचली. दुसऱ्या सत्रातील अखेरच्या क्षणी मोहितने अर्धशतक झळकावलं. यानंतर दोन्ही संघांनी हस्तांदोलन केलं आणि यासह सामना बरोबरीत सुटला. इराणी कप स्पर्धेत सामना बरोबरीत सुटल्यास पहिल्या डावातील आघाडी असलेल्या संघाला विजयी घोषित केलं जातं.
मुंबईने दुसऱ्या डावात 8 बाद 329 धावा केल्या. त्याआधी मुंबईने सर्फराज खान याच्या नाबाद 222 धावांच्या जोरावर 537पर्यंत मजल मारली. तर कॅप्टन रहाणे याने 97 आणि तनुषने 64 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 57 धावांचं योगदान दिलं. मुंबईने रेस्ट ऑफ इंडियाला पहिल्या डावात 416 धावांवर रोखत 121 ची आघाडी घेतली. रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू इश्वरन याने 191 तर ध्रुव जुरेलने 93 धावा केल्या.
मुंबईचा विजयी जल्लोष
That Winning Feeling! 👏 👏
Congratulations to the @ajinkyarahane88-led Mumbai on their #IraniCup triumph 🙌 🙌#IraniCup | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/Er0EHGOZKh pic.twitter.com/1h1kAXLCHR
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 5, 2024
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि एम जुनेद खान.
रेस्ट ऑफ इंडिया प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, इशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.