लखनऊ | नेदरलँड्स क्रिकेट टीमने श्रीलंकासमोर विजयासाठी 263 धावांचं आव्हान ठेवलं आहे. नेदरलँड्सने 49.4 ओव्हरमध्ये ऑलआउट 262 धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी नेदरलँड्सला झटपट झटके देत टॉप आणि मिडल ऑर्डरला पद्धतशीर गुंडाळलं होतं. त्यामुळे नेदरलँड्सची 6 बाद 91 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर नेदरलँड्सने सामन्यात कमबॅक करत 250 पार मजल मारली. नेदरलँड्ससाठी लोगान वॅन बीक आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट या जोडीने तारणहाराची भूमिका बजावली. या दोघांनी केलेल्या वैयक्तिक अर्धशतकांमुळे नेदरलँड्सला सन्मानजनक आव्हान देता आलं.
नेदरलँड्सने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र नेदरलँड्सच्या टॉप आणि मिडल ऑर्डरने श्रीलंकेसमोर गुडघे टेकले. विक्रमजीत सिंह 4 धावांवर आऊट झाला. मॅक्स ओडोड आणि कॉलिन एकरमन या दोघांना चांगली सुरुवात मिळाली, मात्र त्याचा फायदा घेता आला नाही. ओडोड 16 आणि एकरमन 29 धावा करुन माघारी परतला. बास डी लिडे 6 आणि तेजा निदामनुरु 9 रन्स करुन माघारी परतले. कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने 16 धावा जोडल्या. मात्र इथून सारं काही फिरलं.
लोगान वॅन बीक आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट या दोघांनी सातव्या विकेटसाठी 130 धावांची विक्रमी भागीदारी केली. या दरम्यान श्रीलंकेने गचाळ फिल्डिंग केली. त्याचा फायदा जोडीने घेतला. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं केली. सायब्रँड याने 82 बॉलमध्ये 70 धावा केल्या.तर वॅन बीक याने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. दोघेही आऊट झाल्यानंतर नेदरलँड्सने झटपट 2 विकेट्स गमावले.
नेदरलँड्सला आणखी काही धावा जोडण्याची संधी होती. मात्र वॅन डेर मर्व्ह 7 रन्स करुन आऊट झाला. तर पॉल व्हॅन मीकरेन चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात 50 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर 4 धावांवर रन आऊट झाला. त्यामुळे नेदरलँड्स 2 बॉलआधी ऑलआऊट झाली. आर्यन दत्त हा 9 धावांवर नाबाद परतला. श्रीलंकाकडून दिलशान मधुशंका आणि कसुन राजिथा या दोघांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तर महीश तीक्षणा याच्या खात्यात 1 विकेट गेली.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन,
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस, (कॅप्टन आणि विकेटकीपर) पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चरित असलंका, धनंजया डी सिल्वा, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून रजिथा आणि दिलशान मधुशंका.