मुंबई : तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेट खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट खेळासह आणखी चार खेळांनाही ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळालं आहे. 16 ऑक्टोबरला मुंबईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये 2028 ला होणाऱ्या लॉस एंजेलिस गेम्समध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यास आयओसी सदस्यांनी होकार दिला आहे. यावर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश हे स्वागतार्ह पाऊल आहे. या निर्णयामुळे जगातील ऑलिम्पिकमध्ये अनेक नवीन संधी निर्माण होतील. क्रिकेट हा जागतिक स्तरावरील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. दुसरा सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ असून तो फक्त खेळ नसून एक धर्म असल्याचं नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.
2028 च्या ऑलिम्पिकमध्ये समावेश केल्यानंतर आयसीसीला ऑलिम्पिक समितीचं स्थायी सदस्य बनवण्याचा प्रयत्न करू, असं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष (ICC President) ग्रेग बर्क यांनी म्हटलं आहे.
ऑलिम्पिकमध्ये 1900 साली पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला होता. त्यावेळी ग्रेट ब्रिटेन आणि फ्रान्स या संघांमध्ये हा सामना पार पडला होता. कसोटी फॉरमॅटमध्ये हा सामना झाला होता यामध्ये 158 धावांनी ग्रेट ब्रिटेन संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर 1998 आणि 2022 च्या कॉमनवेल्थ गेममध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. 2010, 2014 आणि 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेटला स्थान देण्यात आलं आहे.
IOC Session approves @LA28’s proposal for 5⃣ additional sports:
⚾Baseball/🥎softball, 🏏cricket, 🏈flag football, 🥍lacrosse and ⚫squash have been officially included as additional sports on the programme for the Olympic Games Los Angeles 2028. #LA28 pic.twitter.com/y7CLk2UEYx
— The Olympic Games (@Olympics) October 16, 2023
दरम्यान, क्रिकेटसोबत जे आणखी चार खेळ आहेत त्यामध्ये बेसबॉल-सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश यांचा समावेश आहेत. क्रिकेटसोबत या खेळांना ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाल्याने क्रीडा प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.