आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी उलटफेर करण्यात माहिर असणाऱ्या नेदरलँड्स क्रिकेट टीमने पथकाची घोषणा केली आहे. नेदरलँड्सने सोमवारी 13 मे रोजी संघ जाहीर केला. त्यानुसार स्कॉट एडवर्ड्स हा नेदलँड्सचं नेतृत्व करणार आहे. तसेच या संघात 3 भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. तर 2 अनुभवी खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. विक्रम सिंह, आयर्न दत्त आणि तेजा निदामानुरु या 3 भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर ऑलराउंडर रोएलोफ वॅन डर मर्व आणि फलंदाज कॉलिन एकरमॅन या दोघांना वगळण्यात आलं आहे. हे दोघेही वर्ल्ड कपसाठी उपलब्ध नसल्याने यांचा समावेश करण्यात आला नाही.
तेजा निदामानुरु याचा जन्म आंध्रप्रदेशमधील विजयवाडा येथे झाला. विक्रमजीत सिंह याचं जन्मस्थळ हे पंजाबमधील चीमा खुर्द हे आहे. विक्रमजीत वयाच्या 7व्या वर्षी नेदरलँड्सला गेला. तर आर्यन दत्त जन्माने भारतीय नाही, मात्र तो मुळ भारतीय आहे. आर्यनचे कुंटुबिय हे पंजाबमधील होशियारपूरमधील आहेत. आर्यनचे कुटुंबिय 1980 साली नेदरलँड्समध्ये स्थायिक झाले.
नेदरलँड्स उलटफेर करण्यात माहिर आहे. नेदरलँड्सने 2009 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. इतकंच नाही, तर 2014 साली नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिका टीमला पराभवाची धुळ चारली होती. त्यामुळे आता वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 स्पर्धेत नेदरलँड्स कुणाला पराभूत करुन उलटफेर करणार, याकडे लक्ष असणार आहे.
नेदरलँड्स क्रिकेट टीमचा समावेश हा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी डी ग्रुपमध्ये करण्यात आला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत 20 संघ आमनेसामने असणार आहे. या 20 संघांची विभागणी 5-5 नुसार 4 गटात करण्यात आली आहे. त्यानुसार नेदरलँड्स डी ग्रुपमध्ये आहे. नेदरलँड्ससह या गटात नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. नेदरलँड्स वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात नेपाळ विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. आता या गटातून कोणत्या 2 संघ सुपर 8 मध्ये पोहचणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
नेदरलँड्स क्रिकेट टीम
The Netherlands squad that will feature in the ICC Men’s #T20WorldCup 2024 🇳🇱
More ➡️ https://t.co/6hAjtBM8fS pic.twitter.com/cIYtPOnTfB
— T20 World Cup (@T20WorldCup) May 13, 2024
टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी नेदरलँड्स क्रिकेट टीम : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन), आर्यन दत्त, बास डी लीडे, डेनियल डोरम, फ्रेड क्लासेन, कायल क्लेन, लोगान वॅन बीक, मैक्स ओ’डोड, माइकल लेविट, पॉल वॅन मीकेरेन, साइब्रांड एंगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, टिम प्रिंगल , विक्रम सिंह आणि वेस्ले बर्रेसी.