क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. कसोटी मालिकेआधीच दिग्गज खेळाडूने निवृत्ती जाहीर करत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला आहे. न्यूझीलंडचा दिग्गज आणि अनुभवी गोलंदाज टीम साऊथी याने इंग्लंड विरूद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेनंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र न्यूझीलंड आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचली तर मी उपलब्ध असेल, असंही टीम साऊथीने स्पष्ट केलं आहे. न्यूझीलंडने नुकतंच भारताला मायदेशात 3-0 ने व्हाईटवॉश दिला होता. टीम साऊथी याने यात मोठी भूमिका बजावली होती. तसेच न्यूझीलंडची या मालिका विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्याची शक्यता वाढली आहे.
न्यूझीलंड आता मायदेशात 28 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सलामीचा सामान हा ख्राईस्टचर्च येथे होणार आहे. साऊथीची ही मायदेशातील आणि अखेरची कसोटी मालिका असणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड टीम साऊथीला विजयी निरोप देण्याचा प्रयत्नात असणार आहे. टीम साऊथी याने न्यूझीलंडसाठी आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
“न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करण्याचं माझं लहाणपणापासूनचं स्वप्न होतं. न्यूझीलंडचं 18 वर्ष प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणं, ही माझ्यासाठी सन्मानाची आणि सौभाग्याची बाब आहे. मात्र आता या खेळाला अलविदा करण्याची वेळ आली आहे, ज्याने मला इतकं काही दिलं. कसोटी क्रिकेट माझ्या मनाजवळ आहे. त्यामुळेच मी त्याच टीमविरुद्ध मालिका खेळून निवृत्त होणार आहे, ज्यांच्याविरुद्ध मी कारीकीर्दीची सुरुवात केली होती “, असं टीम साऊथीने म्हटलं. टीम साऊथीने 22 मार्च 2008 रोजी इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. तर आता साऊथी इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेनेच त्याच्या कारकीर्दीला पूर्णविराम लावणार आहे.
टीम साऊथीने अंडर 19 वर्ल्ड कप 2008 स्पर्धेत धमाका केला होता. साऊथीने 17 विकेट्स घेत साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. साऊथीला त्याच्या या कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसेच साऊथीने 18 वर्षांच्या कारकीर्दीत तिन्ही फॉर्मेटमध्ये निर्णायक भूमिका बजावलीय. साऊथी त्याच्या कारकीर्दीत 4 वनडे वर्ल्ड कप, 7 टी 20 वर्ल्ड कप, 2 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 1 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप फायनल सामना खेळला आहे.
टीम साऊथीने न्यूझीलंडसाठी 104 कसोटी सामन्यांमध्ये 385 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच साऊथीने 2 हजार 100 धावा केल्या आहेत. साऊथीने नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यात वीरेंद्र सेहवाग याचा कसोटी क्रिकेटमधील षटकारांचा विक्रम मोडीत काढला होता. साऊथीने कसोटीत 93 सिक्स लगावले आहेत.