मुंबई : न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 11 वा सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात न्यूझीलंडने जबरदस्त कामगिरी केली आहे. बांगलादेशने पहिल्या सामन्यात विजय, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून धोबीपछाड मिळाला आहे. बांगलादेशला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पुढील सर्व सामने जिंकणं आवश्यक आहे. पण बांगलादेशच्या पहिल्या डावातच न्यूझीलंडने वेसण घातल्याचं दिसत आहे. बांगलादेशचे आघाडीचे 4 फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे संघावर दडपण आलं आहे.
लिटन दास ट्रेंड बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर तान्झिद हसन आणि मेहिदी हसन यांच्यात 40 धावांची भागीदारी झाली. पण ही जोडी फोडण्यात लॉकी फर्ग्युसन याला यश आलं. मेहिदी हसन 30 धावा करून तंबूत परतला. तर नजमुल होसेन शांतो अवघ्या 7 धावा करून बाद झाला. अशी सर्व स्थिती असताना 15 व्या षटकात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. कर्णधार केन विलियमसन याने संघाचं 15 वं षटक ग्लेन फिलिप्स यांच्याकडे सोपावलं. त्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नो बॉल आला.
ग्लेन फिलिप्स चेंडू टाकत असताना त्याचा पाय स्टंपला लागला आणि बेल्स पडल्या. पंच धर्मसेना याने तात्काळ तिसऱ्या पंचांशी संपर्क साधला आणि नो बॉल असल्याचं घोषित केलं. त्यामुळे बांगलादेशला फ्री हीट मिळाला. पण त्या चेंडूवर शाकिब अल हसन काही करू शकला नाही. हा चेंडू निर्धाव गेला.
आयसीसीचा हा नवा नियम आहे. यापूर्वी गोलंदाजाचा पाय स्टंपला लागला तर डेड बॉल दिला जायचा. पण यामुळे फलंदाजाचं लक्ष विचलित व्हायचं, असं समालोचक सांगत होते. त्यामुळे आयसीसीने डेड बॉलऐवजी नो बॉल असेल असा नियम बनवला आहे.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहिदी हसन मिराझ, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहिद हृदोय, महमुदुल्ला, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट