कसोटी क्रिकेट विश्वात सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2025 साठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड टीम कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. शनिवारी 14 डिसेंबरपासून 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा सीडन पार्क, हॅमिल्टन येथे होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना हा द गाबा, ब्रिस्बेन येथे होणार आहे.
तिसरा कसोटी सामना हा एका दिग्गज खेळाडूच्या कारकीर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. या सामन्यानंतर तो निवृत्त होणार आहे. त्या खेळाडूने याआधीच याबाबतची घोषणा केली होती. न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज टीम साऊथी याचा हा शेवटचा सामना असणार आहे. साऊथी त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा सामान खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा हा सामना जिंकून साऊथीला विजयी निरोप देण्यासह मालिकेचा शेवट विजयाने करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरणार आहे.
न्यूझीलंड टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलपर्यंत पोहचली, तर मी शेवटपर्यंत उपलब्ध असेन, असं साऊथीने म्हटलं होतं. मात्र न्यूझीलंड फायनलच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. त्यामुळे साऊथीचा हा शेवटचा सामना असल्याचं स्पष्ट झालं आहे.
टीम साऊथीने 22 मार्च 2008 रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. साऊथीने तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. साऊथीने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 201 डावांमध्ये 389 विकेट्स घेतल्या. साऊथीने 15 वेळा 5 तर 1 वेळा 10 विकेट्स घेतल्या.
तसेच साऊथीने 153 डावांमध्ये 7 अर्धशतकांसह 2 हजार 220 धावाही केल्या आहेत. साऊथीने या दरम्यान 95 षटकार आणि 214 चौकार ठोकले आहेत.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (विकेटकीपर), गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, मॅथ्यू पॉट्स आणि शोएब बशीर.
न्यूझीलंड संघ: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, केन विल्यमसन, रचीन रवींद्र, डॅरिल मिशेल, विल्यम ओरोरके, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, टीम साउथी, मिचेल सँटनर, जेकब डफी, विल डफी यंग आणि मार्क चॅपमन.