टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात आलेला तिसरा कसोटी सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला. यासह 5 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत राहिली. टीम इंडियाचा अनुभवी आणि दिग्गज ऑलराउंडर आर अश्विन याने कुणाच्या ध्यानीमनी नसताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेत चाहत्यांना मोठा झटका दिला. अश्विनच्या या अशा निर्णयामुळे त्याला निरोपही देता आला नाही. मात्र फक्त अश्विनच नाही तर आणखी एका खेळाडूने तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर क्रिकेटला अलविदा केला आहे. तो कोण आहे? हे आपण जाणून घेऊयात.
न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टीम साऊथी हा इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त झाला. टीमने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृ्त्त होणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. इंग्लंडने यजमान न्यूझीलंडचा पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये धुव्वा उडवत मालिकेवर नाव कोरलं होतं. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 14 ते 18 डिसेंबर दरम्यान सीडन पार्क हॅमिलटन येथे खेळवण्यात आला. न्यूझीलंडने या सामन्यात इंग्लंडचा चौथ्याच दिवशी 423 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने यासह लाज राखली आणि टीम साऊथीला विजयी निरोप दिला.
टीम साऊथीने त्याच्या अखेरच्या सामन्यात एकूण 2 विकेट्स घेतल्या. साऊथीने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बेन डकेट आणि जेकब बेथल या दोघांना आऊट केलं. जेकब बेथल हा साऊथीचा अखेरचा शिकार ठरला. मात्र साऊथीला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही. तसेच साऊथीने बॅटिंगने धमाका केला. साऊथीने पहिल्या डावात 3 खणखणीत षटकारांसह 23 धावांची खेळी केली. मात्र साऊथीला दुसऱ्या डावात अवघ्या 2 धावाच करता आल्या.
न्यूझीलंडने पहिल्या डावात 347 धावा केल्या. त्यानंतर यजमानांनी इंग्लंडला पहिल्या डावात 147 धावांवर गुंडाळलं आणि 204 रन्सची लीड घेतली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मिचेल सँटनर याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात केन विलियमसन याने केलेल्या 156 धावांच्या खेळीच्या जोरावर 453 रन्स केल्या. त्यामुळे इंग्लंडला 657 धावांचं आव्हान मिळालं. मात्र इंग्लंडला 47.2 ओव्हरमध्ये 234 धावांवर ऑलआऊट केलं. न्यूझीलंडने अशाप्रकारे चौथ्या दिवशी 423 धावांनी सामना जिंकला.
साऊथीचा न्यूझीलंड ‘टीम’ला अलविदा
🇳🇿 391 wickets
🏏 98 sixes with bat in hand
🏆 #WTC21 winnerTim Southee’s prolific Test career comes to a close 👏 pic.twitter.com/FxgCuAoKSV
— ICC (@ICC) December 17, 2024
साऊथीने न्यूझीलंडचं 107 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 125 टी 20i सामन्यात प्रतिनिधित्व केलं. साऊथीने या तिन्ही प्रकारात अनुक्रमे 391, 221 आणि 164 विकेट्स घेतल्या. तसेच साऊथीने टेस्ट, वनडे आणि टी 20i मध्ये अनुक्रमे 2245, 742 आणि 303 धावा केल्या.