NZ vs PAK 3rd T20i | पाकिस्तानच्या पराभवाची ‘मालिका’ सुरुच, न्यूझीलंड 45 धावांनी विजयी

| Updated on: Jan 17, 2024 | 3:35 PM

New Zealand vs Pakistan 3rd T20i | पाकिस्तानला न्यूझीलंड विरुद्ध सलग तिसऱ्या टी 20 सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडने विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे.

NZ vs PAK 3rd T20i | पाकिस्तानच्या पराभवाची मालिका सुरुच, न्यूझीलंड 45 धावांनी विजयी
Follow us on

ऑकलंड | पाकिस्तान क्रिकेट टीमने कमालीचं सातत्य राखत मालिका पराभवाची मालिका कायम ठेवण्यात यश मिळवलंय. पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मालिकेत पराभूत होण्याची कामगिरी केली आहे. पाकिस्तानला विजयासाठी तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडकडून 225 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र पाकिस्तानला निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 179 धावाच करता आल्या. बाबर आझमचं सलग तिसऱ्या टी 20 अर्धशतक वाया गेलं. बाबरने पाकिस्तानकडून सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. बाबरने यासह मालिकेतील पहिल्या 3 सामन्यात अर्धशतकांची हॅटट्रिक झळकावली. मात्र त्याची ही हॅटट्रिक उपयोगी आली नाही.

पाकिस्ताननला चितपट करत न्यूझीलंडने हा सामना 45 धावांनी जिंकला. न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून बाबर व्यतिरिक्त मोहम्मद नवाझ आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी अनुक्रमे 28 आणि 24 धावा केल्या. तर इतरांनी 20 च्या आधीच विकेट टाकल्या. न्यूझीलंडकडून बॉलिंग केलेल्या 5 गोलंदाजांनी किमान 1 विकेट घेतली. टीम साऊथी याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर मॅट हॅनरी, लॉकी फर्ग्यूसन, कॅप्टन मिचेल सँटरन आणि इश सोढी याने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने या संधीचा नेहमीप्रमाणे फायदा उचलला. न्यूझीलंडने फिन एलन याच्या झंझावाती शतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 7 विके्टस गमावून 224 धावा केल्या. फिन एलन याने सर्वाधिक 137 धावांची खेळी केली. एलनने या खेळीत 62 बॉलमध्ये 5 चौकार आणि 16 षटकार ठोकले.

एलन व्यतिरिक्त विकेटकीपर बॅट्समन टीम सायफर्ट याने 31 धावा केल्या. तर पाकिस्तानचे गोलंदाज पुन्हा महागडे ठरले. हरीस रोफ याने 4 ओव्हरमध्ये 60 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन शाहीन अफ्रिदी, मोहम्मद नवाझ, झमान खान आणि मोहम्मज वसीम ज्युनिअर या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. दरम्यान मालिकेतील चौथा सामना हा 19 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.

पाकिस्तानने मालिका गमावली

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | मिचेल सँटनर (कॅप्टन), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, ईश सोधी, टीम साउथी, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | शाहीन आफ्रिदी (कॅप्टन), सैम अयुब, मोहम्मद रिझवान, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझम खान (विकेटकीपर), जमान खान, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसीम ज्यूनिअर आणि हरिस रौफ.