ख्राईस्टचर्च | पाकिस्तानला अखेर सलग 8 पराभवानंतर विजय मिळवण्यात यश आलं आहे. पाकिस्तानने न्यूझीलंड विरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात यशस्वीरित्या 135 धावांचा बचाव करत शेवट गोड केला आहे. पाकिस्तानने किवींना विजयासाठी 135 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचं 17.2 ओव्हरमध्ये 92 धावांवर पॅकअप झालं. शाहिन शाह अफ्रिदीच्या नेतृत्वात हा पहिला विजय ठरला. तर न्यूझीलंडने ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. मात्र अखेरच्या सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तानला क्लिन स्वीप देण्याची संधी हुकली.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी 135 धावांचा पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडला सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके दिले. एक एक करत पाकिस्तानने न्यूझीलंडला गुंडाळलं. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स याने सर्वाधिक 26 धावा केल्या. ओपन फिन एलन याने 22 धावा जोडल्या. विकेटकीपर टीम सायफर्ट याने 19 आणि विल यंग याने 12 धावांचं योगदान दिलं. लॉकी फर्ग्यूसन याला भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांना 5 पार मजल मारता आली नाही.
पाकिस्तानकच्या अब्बास अफ्रीदी याचा अपवाद वगळत सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या. इफ्तिखार अहमद याने तिघांना तंबूत पाठवलं. तर कॅप्टन शाहिन आफ्रिदी आणि मोहम्मद नवाझ या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर झमान खान आणि उस्मा मीर या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
पाकिस्तान विजयी
Pakistan stun New Zealand in Christchurch!#NZvPAK Scorecard 📝 https://t.co/eQBun9UMwC pic.twitter.com/YMXOY5700X
— ICC (@ICC) January 21, 2024
त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून विकेटकीपर रिझवान आणि फखर झमान या दोघांनी सर्वाधिक अनुक्रमे 38 आणि 33 धावा केल्या. तर इतरांनी छोटेखांनी खेळी करुन बहुमूल्य योगदान दिलं. पाकिस्तानने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 134 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून टीम साऊथी, मॅट हॅनरी, लॉकी फर्ग्यूसन आणि इश सोढी या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, रचिन रवींद्र, टिम सेफर्ट (विकेटकीपर), विल यंग, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, इश सोधी, मॅट हेन्री, टिम साउथी आणि लॉकी फर्ग्युसन.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | शाहीन अफ्रिदी (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), हसीबुल्ला खान, बाबर आझम, फखर जमान, साहिबजादा फरहान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, अब्बास अफ्रिदी आणि जमान खान.