श्रीलंका क्रिकेट टीमने न्यूझीलंड दौऱ्याचा शेवट गोड आणि विजयाने केला आहे. श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 150 धावांनी धुव्वा उडवला आहे. श्रीलंकेने न्यूझीलंडसमोर 291 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला धड 30 ओव्हरही खेळता आलं नाही. श्रीलंकेने न्यूझीलंडला 29.4 ओव्हरमध्ये 250 धावांवर गुंडाळलं. श्रीलंकेने या विजयासह लाज राखली आणि न्यूझीलंडला विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखलं. यजमान न्यूझीलंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
न्यूझीलंडकडून मार्क चॅपमॅन याने सर्वाधिक धावा केल्या. चॅपमॅन याने 81 बॉलमध्ये 81 धावांची खेळी केली. चॅपमॅनने या खेळीत 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. चॅपमॅन या व्यतिरिक्त एकालाही 20 पार मजल मारता आली नाही. तिघांनी दुहेरी आकडा गाठला. तर तिघांना भोपळाही फोडता आला नाही. श्रीलंकेकडून 3 गोलंदाजांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. असिथा फर्नांडो, महीश तीक्षणा आणि इशान मलिंगा या तिघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर जनिथ लियानगे याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 290 धावा केल्या. श्रीलंकेसाठी एकूण तिघांनी अर्धशतकी खेळी केली. तर इतरांनीही योगदान दिलं. ओपनर पाथुम निसांका याने 42 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 6 फोरसह 66 रन्स केल्या. कुसल मेंडीसने 54 धावा जोडल्या. तर जनिथ लियानागे याने 53 रन्स केल्या. कामिंदु मेंडीसने 46 धावांची भर घातली. तर इतरांनी चांगली साथ दिली.
न्यूझीलंडकडून मॅट हॅनरी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. कॅप्टन मिचेल सँटनर याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर नॅथन स्मिथ आणि मायकेल ब्रेसवेल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
न्यूझीलंडचा मालिका विजय, श्रीलंकेचा शेवट गोड
A win for Sri Lanka in the final match of the Chemist Warehouse ODI series in Auckland. Mark Chapman top-scoring with a fighting 81 on in his home patch. Catch up on all scores | https://t.co/bbHsVSKeJe 📲 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/COqUXmukJY
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 11, 2025
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि विल्यम ओरुर्के.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, महीश तीक्षाना, एशान मलिंगा आणि अशिथा फर्नांडो.