NZ vs SL Weather Report | न्यूझीलंड-श्रीलंका सामन्यावर पावसाचं सावट, मॅच रद्द होणार?

| Updated on: Nov 09, 2023 | 8:46 AM

New Zealand vs Sri Lanka Benguluru weather | वर्ल्ड कप सेमी फायनलच्या एका जागेसाठी 3 संघांमथ्ये चुरस रंगली आहे. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. या सामन्याच्या निकालाने सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

NZ vs SL Weather Report | न्यूझीलंड-श्रीलंका सामन्यावर पावसाचं सावट, मॅच रद्द होणार?
Follow us on

बंगळुरु | वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 41 वा सामना आज 9 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका या सामन्यात आमनेसामने असणार आहेत. सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलमधील चौथ्या संघाच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सेमी फायनलसाठी क्वालिफाय झाली आहे. आता न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या तिघात 1 जागेसाठी मारामारी आहे. या तिन्ही संघांकडे प्रत्येकी 8-8 पॉइंट्स आहेत. न्यूझीलंड-श्रीलंका सामन्यावर पावसाचं सावट आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर पाकिस्तानसाठी ते फायदेशीर ठरणार आहे.

सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना समसमान प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात येईल. त्यामुळे न्यूझीलंडचे 9 पॉइंट्स होतील. तर पाकिस्तानने साखळी फेरीतील नववा आणि अखेरचा सामना जिंकल्यास ते थेट सेमी फायनलला पोहचतील. पाकिस्तानचा सामना इंग्लंड विरुद्ध होणार आहे.तसेच दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकाला गुंडाळल्यास मग मात्र पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरेल. कारण मग अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे 10 पॉइंट्स होतील. मग नेट रनरेटच्या हिशोबाने सेमी फायनलची चौथी टीम ठरेल.

बंगळुरुत जोरदार पावसाची शक्यता

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. एक्युवेदरनुसार, दुपारी 2 वाजता पावसाची 50 टक्के शक्यता आहेत. बंगळुरुच गेल्या 24 तासांपासून पाऊस होत आहे. त्यामुळे न्यूझीलंडची चिंता वाढली आहे. न्यूझीलंडला आधीच पाकिस्तान विरुद्ध 400 पेक्षा अधिक धावा करुनही डीएलएस नियमानुसार पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे बंगळुरुत पाऊस ही बातमी न्यूझीलंडसाठी धोक्याची घंटा आहे. तसेच पाकिस्तानसाठी पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

न्यूझीलंडचा आटोकाट प्रयत्न

दरम्यान न्यूझीलंड हा सामना जिंकून कोणत्याही परिस्थितीत सेमी फायनलमध्ये पोहचण्याचे प्रयत्न करणार आहे. न्यूझीलंडने हा सामना जिंकल्यास पाकिस्तानला इंग्लंडचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल. कारण पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचे पॉइंट्स सारखे झाल्यावर नेट रनरेट हा मुद्दा निर्णायक ठरणार आहे. इतकंच नाही, तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध विजय मिळवून अफगाणिस्तानही क्वालिफाय करु शकते. पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव झाला आणि अफगाणिस्तान विजयी झाली तर ते थेट सेमी फायनलला पोहचतील. त्यामुळे सेमी फायनलमध्ये कोण पोहचेल हे आता वरुणराजाच्या हातातही आहे.

न्यूझीलंड क्रिकेट टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम लॅथम (विकेटकीपर), डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, कायल जेमिसन, जेम्स नीशम आणि विल यंग.

श्रीलंका क्रिकेट टीम | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका, दिमुथ करुणारत्ने, दुष्मंता हेमंता, दिमुथ करुणारथने, लहीरु कुमारा आणि दुनिथ वेल्लालागे.